* वर्षाला 12 कोटी स्वच्छतेवर खर्च, तरी शहरात दुर्गंधीचा डंका!
* मुख्याधिकारी जोमात...पण जिल्हाधिकारी कोमात ? आपचे शहराध्यक्ष खान यांचा सडेतोड सवाल!
खोपोली / खलील सुर्वे :- “स्वच्छतेचे मिशन मोठे, पण शहर दुर्गंधीने गच्च!” असे चित्र सध्या खोपोली शहराचे झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छतेचा ‘राजा’ मिरवतोय, आणि प्रशासन मात्र फाईलच्या सावलीत झोपलेले दिसते. खोपोलीकरांना विचारायचे आहे, हे स्वच्छतेचे पैसे गटारात गेलेत का की, अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित कॅबिनमध्ये ? कधी जागे होणार.
* 12 कोटींचा खर्च...पण शहर दुर्गंधीत बुडालंय :- नगर परिषद लेखापाल संतोष तळपे यांनी कबूल केलंय की, दरवर्षी 10 ते 12 कोटी रुपये स्वच्छतेसाठी खर्च होतात. मग प्रश्न असा की, या पैशांनी नेमके काय स्वच्छ केले जाते ? शहरात गटारे तुडुंब भरलेली, नाल्यांमधून दुर्गंधीचा महोत्सव आणि मोकाट जनावरांनी कचऱ्यावर मेजवानी लावलीय! हे सगळं पाहून खोपोलीकर म्हणतात की, स्वच्छ भारत मिशन इथे नाही, इथे ‘घाणेरडे शहर मिशन’ सुरू आहे.
* सकाळी थम लावा, दुपारी घरी पळा :- नगर परिषदेत अधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम कँटीन’ सुरू आहे. सकाळी थम लावून हजेरी देतात आणि दुपारी 1 वाजता ‘लंच ब्रेक’ नावाखाली हॉटेलात डबे खातात, ते पण थेट सरकारी वेळेत, सरकारी खुर्ची सोडून! दरम्यान एसी, लाईट, फॅन, चालूच ठेवलेले म्हणजे वीज वाया, वेळ वाया आणि जनता की माया भी! हे लोकसेवक नाहीत, हे लोकांचे ‘लोकल शहेशहा’ आहेत, असा उपहास नागरिकांनी केला आहे.
* डॉंक्टर मुख्याधिकारी - पण शहर आजारी :- खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी बीएएमएस (BAMS) डॉंक्टर आहेत. पण त्यांची डॉक्टरकी शहराच्या विकासाला आजारातून बरे करू शकलेली नाही. ते सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत, नेहमीच व्हिव्हिआयपी गराडा अन् फोन असतात. सामान्य नागरिक, पत्रकार किंवा कार्यकर्ते गेले की उत्तर एकच, साहेब आले नाहीत, आले होते पण गेले... पुन्हा कधी येतील माहित नाही!
* 'आप' शहराध्यक्ष खान यांचा रोखठोक सवाल :- आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सरळ सवाल केला आहे की, जिल्हाधिकारी साहेब खोपोली नगर परिषदेतील अधिकारी जर घरी जाऊन जेवू शकतात, तर इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही परवानगी द्या किंवा मग यांच्यावर कारवाई करा, कायदा सगळ्यांसाठी एकच असतो.
* शहरात गटार, कचरा आणि मोकाट जनावरांचे राज्य :- खोपोलीत गटारे भरलेली, कचऱ्याचे ढीग आणि त्यावर कुत्रे, मोकाट जनावरांची मिरवणूक. मार्केट परिसरात दुर्गंधी, रस्त्यांवर घाण हे दृश्य पाहून नागरिक संतापलेत. एका वृद्ध नागरिकाने सांगितले की, असे वाटते नगर परिषद स्वच्छता नाही 'रुग्णालयांसाठी रुग्ण तयार करणे’ हेच ध्येय ठेवून आहे.
* एसी, खुर्च्या, बोनस...पण काम शून्य :- नगर परिषद अधिकाऱ्यांकडे सर्व सरकारी सुविधा आहेत. एसी कॅबिन, थंड पाणी, हेल्थ इन्शुरन्स, टोलमाफी, बोनस, मोठे वेतन, घरी जावून जेवण, चहासाठी दिवसातून दहा वेळा गुडलक चौकावर जाणे, तिथे उभे राहून तासन्तास गप्पा मारणे, दुपारी जेवण व झोप घेवून आरामशीर कार्यालयात येणे…पण कामाच्या बाबतीत “संपूर्ण झोपलेले” लोकसेवक नव्हे, “लोकांवर ओझे” झालेले प्रशासन असे लोकांचे मत आहे.
“साहेबांचा एसी थंड, पण शहराचे रक्त गरम, घाणीत बुडालेली खोपोली आणि स्वच्छतेचे नाव फक्त फॉर्मवर!”
* नागरिकांची मागणी :- शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाचा लेखाजोखा जाहीर करावा, जेवणासाठी घर गाठणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवणारी नोंद सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. तसे निवेदन आम आदमी पार्टी व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार अशी माहिती देण्यात आली.