दिलीप भोईरांसह 21 जणांना सात वर्षे सक्तमजुरी जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रायगड | जिल्हा प्रतिनिधी :- चोंढी नाक्यावर घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटातील दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्यासह 21 जणांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.30) सुनावली. एकूण 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा प्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बहिरोळे येथील रुपाली थळे या चोंढी येथील व्हिटेवा कॉम्प्युटर क्लासमध्ये 11 सप्टेंबर 2012 रोजी सायंकाळी 60 मुलांचे वर्ग घेत होत्या. त्यांच्याकडे काम करणारा भूषण साबळे याला चहासाठी काही वस्तू आणण्यासाठी पाठविले होते. भूषणसोबत शाहबाज खानही गेला होता. ते दोघे बराच वेळ परत आले नाही. त्यामुळे त्यांना बाहेर पाहण्यासाठी थळे या गेल्या होत्या. त्यावेळी चोंढी नाक्यावर भूषण साबळे व शाहबाज खान यांना अतिष सुर्वे, सज्जाद मुल्ला, विक्रम साळुंखे व विक्रांत कुरतडकर ही मंडळी शिवीगाळी करुन धक्काबुक्की व मारहाण करीत होती. याबाबत मध्यस्थी करुन भूषण, शाहबाज व त्या चौघांना क्लासच्या मागे असलेल्या हॉलमध्ये नेले. त्यांच्यामधील वाद मिटवून पुन्हा क्लासमध्ये आले.
दिलीप भोईर उर्फ छोटम व त्यांचे सुमारे 25 ते 30 साथीदार हे काही हत्यारांसहीत क्लासमध्ये घुसले. ते भूषण व शहाबाजला शिवीगाळी व धक्काबुक्की करु लागले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी थळे यांनादेखील शिवीगाळी करुन धक्काबुक्की केली. तरीदेखील त्यांना पुन्हा समजावून क्लासच्या बाहेर जाण्यास सांगितले. दिलीप भोईर, राहुल दिलीप भोईर, विकम साळुंके, विक्रांत कुडतरकर उर्फ विकी, विशाल साळुंके, सज्जाद मुल्ला यांनी क्लासचे बॅनर फाडून तोडफोड केली. दिलीप भोईर यांनी त्यांच्या हातातील तलवारीने रुपाली थळे यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, थळे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीस दुखापत झाल्याने रक्त आले. भूषण व शहाबाज यांनी थळे यांना त्यांच्या धक्काबुक्कीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. दिलीप भोईर व त्यांच्या साथीदारांनी भूषण, शहाबाज व थळे यांना बाहेर खेचून रस्त्यावर आणून मारहाण केली. त्यावेळी रुपाली थळे यांचे पती विजय थळे, त्यांचे मित्र अविनाश म्हात्रे व शिवाजी ईटकर त्याठिकाणी आले. त्यांनी या मारहाणीतून रुपाली थळेंसह अन्य मंडळींना सोडविण्याचा प्रयत्न केला. दिलीप भोईर यांनी विजय थळे यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. राहुल भोईर यांनी लोखंडी शिगेने त्यांच्या पाठीवर एक झोड घातली. विक्रम साळुंके यांनी रुपाली थळे यांच्या उजव्या हातावर शिगेचा फटका मारला. विकी कुडतरकर याने स्टम्पने पाठीत झोड घातली. विशाल साळुंके याने उजव्या मांडीवर लोखंडी शिगेने झोड घातली. मकरंद भोईर याने एका लाकडी दांडक्याने कमरेवर झोड घातली. दरम्यान, सोडविण्यास आलेल्या रुपाली थळे यांच्या नणंद मनिषा मनोहर घरत यांनादेखील धक्काबुक्की, शिवीगाळी व मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कोणीतरी खेचून नेले आहे.
याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अलिबाग येथील न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. चोंढी नाक्यावर घातक शस्त्राने मारहाण केल्या प्रकरणाचा निकाल अखेर तेरा वर्षांनंतर लागला. न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना गुरुवारी सायंकाळी शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर, विक्रम वामन साळुंखे, विक्रांत विश्वनाथ कुडतरकर, मकरंद रवींद्र भोईर, विकेश वसंत ठक्कर, भरत अभिमान्य खळगे, गणेश रमेश म्हात्रे, संतोष वामन साळुंखे, सज्जाद शगीर मुल्ला, गणेश बळीराम भोईर, विवेक विश्वनाथ कुडतरकर, शिशिर शंकर म्हात्रे, हेमंत अनंत केळकर, जयवंत शामराव साळुंखे, विरेश रमेश खेडेकर, प्रभाकर रामचंद्र गवाणकर, प्रसाद दत्ता शिवदे, अशोक शांताराम थळे, मनोज जगन्नाथ थळे, राजेंद्र काशिनाथ ठाकूर, विजय राजाराम ठाकूर यांचा समावेश आहे.
.jpeg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home