100 कोटीचा भुयारी गटार प्रकल्प, पण शहराच्या माथी उचलली चिखल-खड्ड्यांची शिक्षा!
* खोपोलीत विकासाचा दावा, वास्तवात रस्ते व्हेंटिलेटरवर
दोन वर्षे उलटली, काम अजूनही अर्धवट ; नागरिकांचा संताप उसळला
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील बहुचर्चित 100 कोटींच्या भुयारी गटार प्रकल्पाने शहरवासीयांच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. ठेकेदाराने रस्ते खोदून पाईप टाकले, मात्र त्यानंतर त्या जागेची दुरुस्ती न केल्याने शहरातील रस्ते खड्ड्यांच्या छत्रछायेखाली गेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे दगड, मातीचे ढीग, चिखल आणि पावसाच्या पाण्यात साचणारे प्रदूषण यामुळे खोपोलीकर त्रस्त झाले आहेत. योजनेला सुरुवात होऊन साधारण दोन वर्षांचा काळ उलटला, तरीही काम वरकरणी ‘आय.सी यू.मध्ये’ आणि रस्त्यांची अवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र दिसत आहे.
* रस्ते की रणांगण ? :- शहरातील अनेक भागांमध्ये, चिंचवली शेकीन (DP रोड) सह शहरातील अनेक रस्त्याच्या अगदी मध्यभागी चर खोदण्यात आले. पूर्वी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता खड्डे, माती आणि चिखलाने विद्रूप झाले आहेत. पाईपच्या जागी बसविलेल्या मातीचे बांधकाम खचत असल्याने चेंबर आडवे टांगलेल्या स्थितीत ‘डोके वर काढून’ दिसत आहेत. वाहनधारकांचे नाकीनऊ आले असून रस्ते टाळून वाहन चालविणे महाप्रसंग बनला आहे. खड्ड्यांमधून उडणाऱ्या चिखलाने कपडे खराब होतात, डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर वृद्ध आणि महिलांना चालणे कठीण झाले आहे.
* नागरिक त्रस्त, सवालही तितकेच कडक :- शहरातील नागरीकांचा प्रश्न थेट आहे की, काम अर्धवट असताना ठेकेदाराला बिल कसे देण्यात आले ? पाईपचा फायदा कधी मिळणार ? भुयारी गटाराचे पाणी प्रत्यक्षात शुद्ध होऊन वापरासाठी दिले जाणार का ? बांधकाम विभाग आणि मुख्य्याधिकारी नगरवासीयांसमोर हिशोब कधी मांडणार ? यासोबतच वृत्तपत्रांच्या जाहिरातींचे बिल थकवले जाते, पण ठेकेदाराच्या अर्धवट कामाला पैसे कसे देतात ? असा सवाल जनतेतून सातत्याने उपस्थित केला जात आहे.
* पातळगंगा नदीला प्रदूषणाचा धोका :- बांधकाम प्रकल्पांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावताच ते थेट पातळगंगा नदीत सोडले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नदीतील पाण्याची गुणवत्ता बाधित होत असून पर्यावरणीय धोकाही वाढला आहे.
* विकास की विनाश ? :- खोपोलीकर म्हणतात की, काम झाले नाही, रस्ते दुरुस्त नाही, पण बिल मंजूर...हे कोणते गणित ? पुढे ते जाहीर इशारा देतात की, प्रकल्पाचा हिशोब द्या. अन्यथा जनतेच्या न्यायालयात हाकेवर उभे राहावे लागेल!
भुयारी गटार प्रकल्पाने पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी नागरिकांना त्रासच अधिक दिला आहे. कामाचा वेग, दर्जा आणि पारदर्शकता यात सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. नगर परिषद प्रशासन आणि ठेकेदारांनी तातडीने पावले उचलून रस्त्यांची पुनर्बांधणी करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home