Monday, October 27, 2025

फक्त एका तासांत कर्जत ते पनवेल प्रवास

 पनवेल–कर्जत रेल कॉरिडॉर अंतिम टप्प्यात


मार्च 2026 पर्यंत सुरू होणार नवी लाईन !

प्रवाशांचा 30 मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार

आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाकडे वाटचाल 


कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- पनवेल ते कर्जत हा प्रवास लवकरच अधिक वेगवान, सोयीस्कर आणि अखंड होणार आहे. कारण पनवेल - कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एकूण 2,782 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 79 टक्के पूर्ण झाला असून, मार्च 2016 पर्यंत तो जनतेसाठी सुरू केला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे.


* फक्त एक तासात कर्जत - पनवेल प्रवास :- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सध्या पनवेल - कर्जत दरम्यानचा प्रवास साधारण दीड तासांचा असतो, पण या नव्या कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ फक्त एक तासावर येणार आहे. या रेल्वे लाईनची एकूण लांबी 29.6 किलोमीटर असून पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत या पाच प्रमुख स्थानकांवर काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ प्लॅटफॉर्म, डिजिटल माहिती फलक आणि ऑपरेशनल इमारतींची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.


* एमयूटीपी-3 अंतर्गत अत्याधुनिक रेल्वे अभियांत्रिकीचा नमुना :- ही संपूर्ण कामगिरी मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP-3) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) द्वारे राबवली जात आहे. सिव्हिल कामांमध्ये रेल्वे फ्लायओव्हर, पुल, बोगदे आणि स्थानकांची नवी रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, फॉरेस्ट क्लीयरन्स प्रक्रियेत पर्यावरणीय परिणाम कमीतकमी ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.


* पर्यावरणाचा समतोल राखून विकासाची दिशा :- या प्रकल्पात नैसर्गिक अडथळे टाळून रेल्वे मार्ग आखण्यात आला आहे. जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या भागांमध्ये आवाजरोधक फेन्सिंग आणि पावसाळी जलनिस्सारणाच्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत. पनवेल, मोहोपे आणि कर्जत स्टेशन परिसरात नवीन पार्किंग क्षेत्रे, प्रवासी सुविधा केंद्र आणि बॅरियर-फ्री प्रवेशद्वारे तयार करण्यात आले आहेत.

एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी सांगितले की, पनवेल - कर्जत उपनगरी रेल कॉरिडॉर हा मुंबई महानगरीय क्षेत्रासाठी नवा श्वास ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांना कल्याणमार्गाचा पर्याय मिळेल आणि प्रवास वेळेत मोठी बचत होईल. केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर रायगड, नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील आर्थिक गतीही वाढेल.

त्यांनी पुढे सांगितले की, ही रेल्वे लाईन या आर्थिक वर्षातच प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल. हा प्रकल्प केवळ रेल्वे जोडणी नाही, तर विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.


* महत्त्वाचे मुद्दे एक नजरेत :-


- प्रकल्प खर्च: ₹ 2, 782 कोटी


- मार्ग लांबी : 29.6 किमी (पनवेल–कर्जत)


- काम पूर्णत्व : 79 %


- अंदाजे उद्घाटन : मार्च 2026


- प्रवास वेळ बचत : 30 मिनिटांपर्यंत


- प्रमुख स्थानके : पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home