सौ. शिल्पा कैलास पाटील यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- अलिबाग – रायगड जिल्हा परिषदेच्या नारंगी तोंडली केंद्र शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापक सौ. शिल्पा कैलास पाटील यांना “आदर्श शिक्षक सन्मान २०२३-२४” पुरस्काराने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा. RCF हॉल, कुरूळ, अलिबाग येथे संपन्न झाला.
सौ. शिल्पा कैलास पाटील यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात राजीप शाळा चांभार्ली येथून केली. आठ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर भर देत उल्लेखनीय काम केले. त्यानंतरच्या बारा वर्षांच्या काळात त्यांनी राजिप शाळा होराळे येथे कार्यरत राहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. सलग तीन वर्षे शाळेचा शंभर टक्के शिष्यवृत्ती निकाल लावण्याचा मान त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला मिळाला.
मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना शाळेच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळवले.
सन २०२३ पासून त्यांनी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नारंगी तोंडली केंद्र शाळेचा पदभार स्वीकारला. ग्रामपंचायत व परिसरातील कारखान्यांच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक साधनसामग्री देणगी स्वरूपात मिळवून शाळेचा प्रचंड कायापालट केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने “माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत” तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून रोख दोन लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तसेच “परिसर भाग” उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान शाळेने पटकावला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून अनेक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून दिले. या सर्व कार्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आदर्श शिक्षक माजी मुख्याध्यापक कै. अर्जुन कानू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली.
तसेच सौ. शिल्पा कैलास पाटील यांना त्यांच्या सहकारी शिक्षकवृंदांचे वेळोवेळी सहकार्य आणि पाठबळ मिळत राहिले, हे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.
सौ. शिल्पा पाटील यांचा हा सन्मान त्यांच्या समर्पित कार्याची आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची खरी पावती ठरला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home