Thursday, January 15, 2026

अखेर खोपोलीत ‘साबळे पॅटर्न’

 


 विक्रम साबळे उपनगराध्यक्ष ; दिनेश थोरवे, डॉं. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे स्वीकृत नगरसेवक

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत साबळे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर ‘साबळे पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटविणारे विक्रम साबळे यांच्या निवडीमुळे विशेषतः युवक वर्गांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, नगर परिषदेच्या कारभारात सकारात्मक ऊर्जा संचारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


याचवेळी खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश थोरवे (सुरभी ज्वेलर्सचे संचालक), सामाजिक जाणिवा जपणारे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील तसेच लोकोपयोगी कार्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या अश्विनीताई अत्रे यांची निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांचा प्रभावी सहभाग वाढला आहे.


* अनुभव, अभ्यास आणि समाजाभिमुखतेचा संगम :- विक्रम साबळे, दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे ही सर्व मान्यवर व्यक्तिमत्त्वे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांत सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर ठाम व सातत्यपूर्ण भूमिका ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच विक्रम साबळे यांची उपनगराध्यक्षपदी, तर उर्वरित तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.


* नागरिक व संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व तिन्ही स्वीकृत नगरसेवकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विक्रम साबळे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. तसेच, सर्वच राजकीय पक्षांची समंजस भूमिका आणि खोपोलीकरांचे प्रेम यामुळेच हा विश्वास शक्य झाला. सर्वांचे मनःपूर्वक आभार, असे भावनिक उद्गार यशवंत लक्ष्मणशेठ साबळे यांनी व्यक्त केले.


विक्रम साबळे यांच्यासह दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home