Tuesday, October 21, 2025

विनय कदम प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांचा हस्तक्षेप!

 


तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिला न्यायाचा शब्द ;

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळण्याची आशा

मुंबई / प्रतिनिधी :- विक्रोळी (पूर्व) येथील रहिवासी विनय साहेबराव कदम हे गेल्या सात वर्षांपासून सहानुभूतीच्या नियुक्तीच्या (Compassionate Appointment) प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी झगडत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉं. रामदास आठवले यांनी थेट हस्तक्षेप केला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे प्रकरणाला नवा न्यायाचा मार्ग मिळाल्याची चिन्हे आहेत.

सात वर्षांचा संघर्ष आणि प्रशासनाचा मौन प्रतिसाद :- विनय कदम यांच्या मोठ्या भावाचा, स्व. सुधीर साहेबराव कदम यांचा 2 मे 2018 रोजी अपघाती मृत्यू झाला. ते नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. भावाच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी 5 जुलै 2028 रोजी कंपनीकडे विनय कदम यांना सहानुभूती नियुक्तीवर घेण्याची विनंती केली. विनय कदम यांनी 11 नोव्हेंबर 2019 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला, मात्र कंपनीकडून वर्षानुवर्षे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी 15 जुलै 2024 रोजी कंपनीकडून एक पत्र आले, ज्यात त्यांच्या अर्जास वयोमर्यादेच्या कारणावरून नकार देण्यात आला. या पत्रात दाखवलेला नवा शासन निर्णय (GR) विनय कदम यांच्या संशयाचा विषय ठरला, कारण त्यातील तारीख व मजकूर दोन्ही आधी दाखवलेल्या जीआरपेक्षा भिन्न होते.

 कंपनीचा विरोधाभासी GR आणि अनुसूचित जाती आयोगाची कारवाई :- न्याय मिळविण्याच्या प्रयत्नात विनय कदम यांनी 3 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने 27 मार्च 2025 रोजी कंपनीला स्पष्टीकरण मागवले, मात्र कंपनीने दिलेल्या उत्तरात अनेक विसंगती आढळल्या.

विनय कदम यांनी यावर 9 जून 2025 रोजी प्रतिजवाब दाखल केला आणि या विरोधाभासांचा ठळक उल्लेख केला. आयोगाने 15 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीला ३० दिवसांच्या आत सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. परंतु, सर्वांच्या धक्क्यासाठी, 1 सप्टेंबर 2025 रोजी आयोगाने उत्तर न मिळताच प्रकरण बंद केले.

 तुषार तानाजी कांबळे यांचा ठाम आणि लढाऊ पुढाकार :- या अन्यायाची माहिती तुषार तानाजी कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. प्रकरणाची गंभीरता ओळखून त्यांनी थेट केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला. ना. आठवले यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (मुंबई कार्यालय) चे चीफ बिझनेस मॅनेजर उदयकुमार महानती यांना दूरध्वनीवरून सूचना देत “विनय कदम यांना योग्य तो न्याय देण्यात यावा” असे स्पष्ट आदेश दिले.

यानंतर तुषार कांबळे यांनी स्वतः कंपनीच्या मुंबई कार्यालयात जाऊन उदयकुमार महानती यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी सांगितले की हे प्रकरण त्यांच्या अधिकारात नसून कोलकाता मुख्यालयाच्या अखत्यारीत येते.श्र क्षणाचाही विलंब न करता तुषार कांबळे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांचे पत्र घेऊन थेट कोलकात्याला धाव घेतली.

 कोलकात्यातील उच्चस्तरीय बैठक - न्यायाचा शब्द मिळाला :- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मुख्यालयात (न्यू टाऊन, कोलकाता) तुषार कांबळे यांनी जनरल मॅनेजर अमित सतीश आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीदेवी नायर यांची भेट घेतली. त्यांनी मंत्री महोदयांचे अधिकृत पत्र सादर करून संपूर्ण प्रकरण सविस्तर मांडले. कंपनीने जारी केलेल्या जीआरमधील विसंगतींचे पुरावे दाखवून “विनय कदम यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशी ठाम मागणी केली. या बैठकीत दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय्य निर्णय घेण्यात येईल” असे आश्वासन दिले.

तुषार तानाजी कांबळे यांनी या संदर्भात सांगितले की, मी विनय कदम यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत ही लढाई मी चालू ठेवणार आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 न्यायासाठीचा संघर्ष आणि सामाजिक नेतृत्वाचा नवा आदर्श :- या प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की, संवेदनशील नेतृत्व आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर न्याय मिळतोच. केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांच्या सहानुभूतीपूर्ण हस्तक्षेपामुळे आणि तुषार तानाजी कांबळे यांच्या अथक, जबाबदार आणि लढाऊ भूमिकेमुळे विनय कदम प्रकरणात न्याय मिळण्याची आशा आता अधिक बळकट झाली आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home