शिवसेनेचे दिनेश थोरवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉं. सुनील गोटीराम पाटील व भाजपच्या अश्विनीताई अत्रे यांचा समावेश
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते, सुरभी ज्वेलर्सचे संचालक दिनेश थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि भारतीय जनता पक्षाकडून अश्विनीताई अत्रे यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहभाग वाढला आहे.
दिनेश थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.
* नागरिक व संघटनांकडून अभिनंदन :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून दिनेश थोरवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीचेही सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
* पत्रकार संघटनांकडून सत्कार :- निवडीच्या पार्श्वभूमीवर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन व व्हॉईस ऑफ मीडिया, खालापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिनेश थोरवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डॉं. सुनील पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांचेही अभिनंदन करण्यात आले.
आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिनेश थोरवे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहीन.
दिनेश थोरवे यांच्यासह डॉ. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home