जोरदार वादळ-पावसाने झोपडी जमीनदोस्त
सुदैवाने सर्व कुटुंब वाचले : देवतारी त्याला कोण मारी!* वावंढळ गावातील कातकरी कुटुंबाचा थरारक अनुभव ; नशिबाने वाचला जीव, पण उडाला निवारा
खालापूर / अर्जुन कदम :- खालापूर तालुक्यातील वावंढळ या आदिवासी वस्तीत काल संध्याकाळी आलेल्या अचानक वादळ-पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरेश बारकू कातकरी यांच्या झोपडीवर वाऱ्याने कहर करत क्षणात ती जमीनदोस्त केली. सुदैवाने कुटुंबातील सदस्य त्या वेळी बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, झोपडी उद्ध्वस्त झाल्याने हे संपूर्ण कुटुंब आता बेघर झाले आहे.
डोळ्यांसमोर घर कोसळले :- सुरेश बारकू कातकरी यांचे छोटेसे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करते. मोलमजुरीचा दिवस संपवून आई घरी परतली होती. रात्र झाली तशी झोपडीत उकाडा जाणवू लागल्याने ती नातवंडांना घेऊन अंगणात आली. मुले खेळत होती, आजोबा बारकू गणपत कातकरी ओसरीवर बसून त्यांचा खेळ पाहत होते. तेवढ्यातच आकाशात काळेकुट्ट ढग जमले आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागली. काही क्षणांतच झोपडी हलू लागली, छपरावरील कौल व ताडपत्री उडू लागली आणि धाडकन आवाज करीत संपूर्ण झोपडी कोसळली.
देवतारी त्याला कोण मारी :- त्या क्षणी घरातील सर्व जण अंगणात असल्याने चमत्कारिकरीत्या एकाही व्यक्तीचा जीव गेला नाही. मात्र, झोपडीचे लाकूड, चटया, कपडे आणि घरातील थोडाफार संसारपण पावसात भिजून गेला. गावकऱ्यांनी सांगितले की, जर ते घरात असते तर आज मोठे संकट ओढवले असते. देवतारी त्याला कोण मारी म्हणतात, ते खरे ठरले. वादळ आणि पावसाचा जोर कमी झाल्यावर शेजारच्यांनी सर्व कुटुंबाला बाहेर काढून तात्पुरता आसरा शेजाऱ्यांच्या घरात दिला.
ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाची तत्काळ दखल :- घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी शासकीय यंत्रणेला त्वरित कळवले. तहसीलदार अभय चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मंडळ अधिकारी माणिक सानप व ग्रामसेवक उदय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन
कुटुंबाला धीर दिला. सध्या हे कुटुंब भावाच्या घरात तात्पुरते राहत आहे. शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून मदत मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
डोळ्यांत पाणी, पण देवाचे आभार :- सुरेश बारकू कातकरी यांनी सांगितले की, दिवसभर काम करून घरी आलो, मुले अंगणात खेळत होती. झोपडी हलू लागली, आम्ही बाहेर पडलो आणि दोन मिनिटांत सगळे कोसळले. जीव वाचला, तेच आमचं भाग्य.”
गावकऱ्यांनीही तातडीने या कुटुंबाला अन्न, कपडे आणि निवाऱ्याची मदत दिली आहे.
वावंढळ गावातील ही घटना म्हणजे निसर्गाच्या प्रचंड रौद्र रूपासमोर गरीब माणसाची असहायता आणि त्याच वेळी श्रद्धा व नशिबाचा संगम दाखवणारी जिवंत कहाणी आहे. घर गेले, पण जीव वाचला हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे सणासारखे सुख आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home