खोपोली नगर परिषदेत जनसेवा की जनछळ ?
* जन्म-मृत्यू दाखल्यांत मनमानी, नागरिकांवर अरेरावीचे सावट
* लिपिकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह ; तक्रारी असूनही प्रशासन मौन
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेमधील नागरी सुविधा केंद्राचा उद्देश नागरिकांना सहज, सुलभ आणि सन्मानपूर्वक सेवा देण्याचा आहे, पण प्रत्यक्षात या केंद्रात नागरिकांशी अरेरावी, दुर्लक्ष, विलंब व मनमानी अशी चित्रे दिसत असून, “लोकसेवक की लोकत्रासक ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
खोपोली नगर परिषद नागरी सुविधा केंद्रातील जन्म-मृत्यू दाखला विभागातील कर्मचारी कैलास देशमुख यांच्या मनमानीच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्रकार संघटनेच्या वतीने लेखी तक्रार देखील करण्यात आली होती.
जन्म-मृत्यू दाखले नोंदीचे योग्यरीत्या परीक्षण न करता “नोंद नाही” असे उत्तर देणे, नावातील अक्षरे वगळणे /दुरुस्तीच्या नावाखाली मनमानी बदल करणे, वरिष्ठ आदेश न पाळणे तसेच नागरिकांशी उद्धट वर्तन करणे असे आरोप त्यांच्याविरुद्ध आहेत.
* जेवणाची वेळ 1 ते 4 ? :- केंद्राच्या अधिकृत वेळेतही सेवा न देता, दुपारी 1 ते 4 दरम्यान जेवणाचा ब्रेक घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काय हे सरकारी कार्यालय आहे की प्रायव्हेट कँटीन ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
* जन्म-मृत्यू दाखल्यात बेकायदेशीर दुरुस्ती ? :- परिपत्रकानुसार जन्म-मृत्यू दाखल्यात काना-मात्रा सोडून नाव बदल करता येत नाही, पूर्ण नाव बदलणे नियमबाह्य आहे. मात्र, संबंधित कर्मचारी स्वतःहून आणि मनाने नावे बदलत आहेत, असा गंभीर आरोप आहे.
* नागरिकांचा अनुभव :- दाखला काढायला गेलो तर, पहिल्यांदा एकदम ‘नोंद नाही’ असे सांगितले. नंतर ओळखीच्या व्यक्तीसोबत गेल्यावर काम दोन मिनिटांत!वृद्ध, महिला, सामान्य नागरिकांना त्रास देऊन फाईल फिरवली जाते. सरकारी कार्यालय की मनमानीचे दुकान ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
* प्रशासन कुठे ? :- तक्रारी असूनही परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याने नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांची मागणी आहे की, कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम लागू करावी, तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी, गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, नागरिकांसाठी तक्रार निवारण हेल्पलाइन सुरू करावी.
खोपोलीतील नागरी सुविधा केंद्र नागरिकांसाठी “सुविधा केंद्र” राहणार, की “अडचण केंद्र” बनणार ? नागरिकांची एकच मागणी “काम हक्काने, वागणूक सन्मानाने हवी!” आता अपेक्षा नगर परिषद प्रशासनाची तपास करा… आणि गरज असेल तर कारवाईही करा!


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home