भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी पत्रकारांचा संकल्प!
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासन यांची शपथ
* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांचा पुढाकार
रायगड / प्रतिनिधी :- भ्रष्टाचारमुक्त आणि नैतिकतेवर आधारित भारत घडविण्याच्या दिशेने ‘न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन’ ने ऐतिहासिक पाऊल टाकत ‘Integrity Pledge’ (प्रामाणिकतेची शपथ) घेतली आहे. या शपथपत्रावर संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या स्वाक्षरीने समाजात प्रामाणिकतेचा आणि जबाबदारीचा संदेश देण्यात आला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी नव्या नैतिक दिशादर्शनाचा प्रारंभ ठरत आहे.
* पत्रकारांचा प्रामाणिकतेचा संकल्प - भ्रष्टाचार नाही, जबाबदारी आणि पारदर्शकता आमचा धर्म :- पत्रकार संघटनेच्या या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. शासन, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्वांनी मिळून त्याचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. संघटनेने या शपथेतून नैतिक मूल्यांचे पालन, पारदर्शकता, न्याय्य व्यवसाय पद्धती आणि जबाबदार पत्रकारिता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार केला आहे.
* शपथपत्रातील प्रमुख मुद्दे :-
- आम्ही नैतिक व्यवसाय पद्धतींचा प्रसार करून प्रामाणिकतेची संस्कृती जोपासू.
- आम्ही लाच देणार नाही किंवा स्विकारणार नाही.
- आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्पक्षतेवर आधारित सुशासन अंमलात आणू.
- आम्ही संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करून व्यवसायाचे संचालन करू.
- सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘Code of Ethics’ स्विकारण्यात येईल.
- कर्मचाऱ्यांना कायदे, नियम आणि जबाबदाऱ्यांची जाण करून देऊन प्रामाणिक कार्यसंस्कृती विकसित केली जाईल.
- 'Whistle Blower’ व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करून भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखले जातील.
- आम्ही हितधारक आणि समाजाच्या हक्कांचे संरक्षण करू.
* प्रामाणिकतेशिवाय लोकशाही अपूर्ण - फिरोज पिंजारी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार फिरोज पिंजारी यांनी या प्रसंगी सांगितले की, पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे काम नाही, तर ती लोकशाहीचा चौथास्तंभ आहे आणि या स्तंभाची ताकद प्रामाणिकतेत आहे. आम्ही सर्व पत्रकारांनी आजपासून स्वतःला भ्रष्टाचारमुक्त आणि उत्तरदायी पत्रकारितेसाठी समर्पित केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, सत्य, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचा मार्ग हा कठीण असला तरी, पत्रकार म्हणून समाजासमोर आम्ही आदर्श निर्माण करू.
* जबाबदारीचे प्रतीक, प्रेरणादायी संदेश :- हा शपथपत्र कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातून घेतला गेला असून 27 ऑक्टोबर 2025 रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला आहे. यामध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून फिरोज पिंजारी यांनी अधिकृत प्रतिनिधी म्हणून सही केली आहे. या उपक्रमाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, राष्ट्रीय सचिव अनिल पवार तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि तरुण पिढीने मोठा प्रतिसाद दिला आहे. हा उपक्रम केंद्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोग (CVC) च्या ‘Vigilance Awareness Week’ या उपक्रमाशी सुसंगत आहे.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home