Monday, October 20, 2025

खोपोली नगर परिषदेत ‘महासामना’ रंगणार !

 

 शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, महाविकास आघाडी - सगळेच रिंगणात

उमेदवारीच्या स्पर्धेत ‘कौन कुणाचा, आणि कुणाचा कोण?’

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची रांग एवढी लांब झाली की, उमेदवार ठरवणे म्हणजे आता निवडणुकीपूर्वीचे युद्ध ... असे स्थानिक राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

एकीकडे शिवसेना शिंदे गट, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि महाविकास आघाडी अशा सगळ्याच गटांनी आपल्या घोडदौडीला सुरुवात केली आहे.

कौन कुणाचा आणि कुणाचा कोण ? :- शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी चुरस तीव्र झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉं. शेखर जांभळे ही नावे जोरदार चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, गटनेते मंगेश दळवी ही नावे चर्चेत आहेत. भाजपकडून युवा नेते विक्रम साबळे आणि अश्विनीताई पाटील या दोघांमध्ये स्पर्धा रंगली आहे.

महाविकास आघाडी अजूनही शांत आहे, पण शांततेच्या मागे वादळ दडलेले असते, हे राजकारणात सर्वश्रुत आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), आम आदमी पार्टी (आप), रिपाई (आठवले), वंचित बहुजन आघाडी सगळ्यांचे राजकारणी सध्या फक्त फोनवर आणि मांडवात आहेत.

 एकच शहर, दोन शिवसेना - राजकीय नाटकाचा पहिला अंक सुरू :- राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेनेने कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी दिल्यास डॉं. शेखर जांभळे हे दुसऱ्या शिवसेनेत म्हणजेच महाविकास आघाडीकडून उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

म्हणजेच एकाच शहरात दोन शिवसेना - एक अधिकृत, एक आघाडीवाली!

दरम्यान, राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि भाजपचे विक्रम साबळे यांनीही आपापले तंबू ताणले आहेत. “मलाच उमेदवारी हवी!” असा आवाज सध्या प्रत्येक पक्षाच्या दालनात घुमतोय.

 कुणाच्या गळ्यात माळ टाकावी ? पक्षश्रेष्ठींचीही चक्रावलेली अवस्था :- राजकीय पातळीवर सगळेच इच्छुक नेते पक्षश्रेष्ठींना भेटीगाठी घेत आहेत. कोणी स्वतःला पक्षनिष्ठ मनवतो, तर कोणी समाजसेवक म्हणून पुढे सरसावतो. पक्षश्रेष्ठींची मात्र अवस्था बिचारी...गळ्यात कोणाची माळ टाकावी ? हा प्रश्न त्यांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

चौरंगी नाही, आता पचरंगी लढत रंगण्याची चिन्हे :- या सगळ्या गदारोळात, खोपोली नगर परिषद निवडणूक चौरंगी नव्हे तर पचरंगी होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना, सुधाकर घारे यांची राष्ट्रवादी, विक्रम साबळे यांची भाजपा, महाविकास आघाडीचा उमेदवार आणि स्वतंत्र लढतीला सज्ज असलेले डॉं. शेखर जांभळे...या सर्वांमध्ये “महासामना” रंगण्याची तयारी सुरू आहे.

निवडणूक नाही, राजकीय महाभारत :- स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, खोपोलीत निवडणूक नव्हे, महाभारतच सुरू झाले आहे. प्रत्येकजण अर्ज घेऊन फिरतोय आणि म्हणतोय - मीच उमेदवार! दरम्यान, शहरात गट, उपगट, छुपी आघाड्या आणि गुप्त बैठका यांचा खेळ जोमात आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच ‘कोण कुणाचा आणि कुणाचा कोण?’ हा खरा खेळ समोर येईल.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home