Tuesday, October 28, 2025

पेट्रोलचा दर वाढतोय…पण पंपावर सुविधा घटल्यात !

 


खालापूरच्या भारत पेट्रोलियम पंपावर ग्राहकांचा आक्रोश 


* पंपावर खड्ड्यांची राज्यश्री, डबक्यांमध्ये पेट्रोल भरा म्हणणारे कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारत व्यस्त...स्थानिक प्रशासन झोपेत की ‘पंपात’ हिस्सा आहे ?


खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर सुरक्षा, सुविधा आणि स्वच्छता या तिन्ही गोष्टींची अवस्था “भारतीय रस्त्यांसारखीच...खड्ड्यांनी भरलेली!" शासनाचे नियम म्हणजे फक्त ग्राहकांसाठीच काय ? पंप मालक आणि कर्मचारी हे “सुविधा अपवाद” आहेत का ? असा सवाल नागरिकांनी थेट तहसिलदार व स्थानिक प्रशासनाला केला आहे.


* भारत पेट्रोलियमचा कृष्णा पंप की खड्ड्यांचा तलाव ? :- खालापूर तहसील कार्यालयापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या कृष्णा पेट्रोलियम पंपावर सध्या पाण्याचे राज्य आहे...पेव्हर ब्लॉक खचले, टेमक्या उखडल्या, आणि खड्डे इतके खोल की पंपाच्या नावाऐवजी “कृष्णा तलाव” म्हणावे असेच चित्र आहे. ग्राहक वाहन पेटवतात तेवढ्यातच गाडी खड्ड्यात बुडते आणि पेट्रोल भरण्यासाठी डबक्यांमध्ये उभे राहणे म्हणजे दररोजचा व्यायाम! गाडी स्वच्छ आणली तरी परत निघेपर्यंत माती, पाणी आणि चिखलाचे ट्रीटमेंट फ्री!


* ग्राहकांना नियम, कर्मचाऱ्यांना सवलत ? :- पंपावर मोठे बोर्ड आहेत की, “मोबाईल वापरू नका, सुरक्षितता पाळा!” पण कर्मचाऱ्यांचे चित्र बघा... एका हातात पाईप आणि दुसऱ्या हातात मोबाईल! फोनवर गप्पा, हसणे आणि मध्येच “फुल पेट्रोल टाकू का सर?” ग्राहकांना ‘धोका’ सांगणारे हेच कर्मचारी हेल्मेट नाही, मास्क नाही, आयडी कार्ड नाही, सेफ्टी शूज नाही! पण ड्रेस मात्र एकदम टापटिप - “सुरक्षितता नाही, स्टाईल आहे!”


* सुविधा फक्त बोर्डांवर - प्रत्यक्षात अंधारात ग्राहक : - शौचालय - नावालाच! आत दुर्गंध, पाणी नाही. पिण्याचा वॉटर कूलर - कूलर आहे, पण पाणी गायब! हवा भरण्याचं मशीन - बंद! मेडिकल बॉक्स - ‘बुक माय शो’वर शोधावा लागेल! कधी पेट्रोल नाही, कधी डिझेल नाही, कधी सीएनजी नाही, पण “पंप बंद” अशी सूचना मात्र लावली जात नाही! डेन्सिटी मीटर बंद, तक्रार रजिस्टर मालकाकडे अर्थात, “ग्राहक तक्रार करतो, पण तक्रार त्याच्याकडेच बंद होते!”


* फ्री सुविधा फक्त जाहिरातींत :- शासन सांगते “पंपांवर ग्राहकांसाठी मोफत सुविधा आहेत.” पण वास्तव काय मोफत काहीच नाही, उलट हवा भरण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. ग्राहक त्रस्त, पण अधिकारी “रात्र झाली, बात गेली” या धोरणावर!


* शासनाची झोप - अपघाताची वाट :- या पंपाच्या अगदी जवळ तहसील कार्यालय आहे. पण अधिकार्‍यांनी एकदाही पाहणी केली का? नाही. कारण ते स्वतःच्या गाड्यांतून फक्त सरळ निघून जातात. दुर्घटना घडली की मगच “कारवाईचा पंप” सुरू होईल का ? ग्राहकांनी नियम तोडला तर दंड, पण कर्मचारी तोडले तरी माफी का? खड्डे आणि घाणीचा पंप ठेवून ‘भारत पेट्रोलियम’चा सन्मान कसा ? शासन आणि ऑईल कंपनी झोपेत आहेत का, की मुद्दाम डोळे झाकून बसली आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home