Monday, October 27, 2025

संरक्षित वन्यजीव प्राण्याचे मांस वाडगाव येथून जप्त!

 


अलिबाग वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

* आरोपीला अटक ; वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

रायगड / प्रतिनिधी :- वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सक्त कायदे असूनही बेकायदेशीररीत्या मांस विक्री आणि साठवणुकीच्या घटना सुरूच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे उघडकीस आली आहे. संरक्षित वन्यजीव प्राण्याचे सुमारे 1 किलो वजनाचे मांस बाळगल्याप्रकरणी अलिबाग वन विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.


* संयुक्त कारवाई - गुप्त माहितीवरून छापा :- 23 ऑक्टोबर 2025 रोजी अलिबाग पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाडगाव येथील जयेंद्र काशिनाथ भगत (वय 49) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान घरातून संशयास्पद वन्यजीव प्राण्याचे मांस जप्त करण्यात आले. सदर मांसाचा नमुना सिल करून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, ज्यातून कोणत्या प्रजातीच्या प्राण्याचे मांस आहे हे स्पष्ट होणार आहे.


* वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा :- संशयिताविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार, विक्री किंवा साठवणूक करणे हे गंभीर गुन्हा असून अशा गुन्ह्यांसाठी तीन ते सात वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे.


* कारवाईत सहभागी अधिकारी आणि पथक :- ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब रतन जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी नरेंद्र सिताराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात तुकाराम जाधव, निलेश चांदोरकर, प्रभाकर भोईर, महेश नाझरकर, जयवंत घरत, दीपक मोकल, राम टाकरस, पंकज घाडी आणि राजेंद्र पवार या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.


* अशा गुन्ह्यांवर शून्य सहनशीलता :- वन विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, संरक्षित वन्यजीवांची शिकार, विक्री, साठवणूक किंवा मांसाचे बाळगणे हे गंभीर गुन्हे आहेत. कोणालाही कायद्यापासून सूट मिळणार नाही. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरू राहील.


* वन्यजीव गुन्हे दिसल्यास तत्काळ कळवा :- वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या परिसरात वन्यजीव शिकार, मांस विक्री किंवा अवैध साठवणुकीचे प्रकार दिसले, तर त्वरित अलिबाग वन विभागाला संपर्क करा. जनतेच्या सहकार्यानेच वन्यजीव संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावी होईल, असेही विभागाने म्हटले आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home