Saturday, October 25, 2025

नदी उशाला कोरडं घशाला...सुभाषनगर ग्रामस्थ पाण्याविना त्रस्त!

 


 आठ दिवसांपासून नळ कोरडे ; कर आणि पाणीबिल भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर ग्रामस्थ संतप्त!

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सुभाषनगर परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. “नदी जवळ, टाक्या भरल्या... पण नळ कोरडेच!” अशा शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

* बिल वेळेवर, पण पाणी वेळेवर नाही :- सुभाषनगर मधील रहिवाशांनी पाणी बिल आणि कर वेळेवर भरलेले असतानाही, नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही प्रामाणिकपणे सर्व कर भरतो, मग आमचे पाणी कुठे जाते ? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

* नगर परिषदेच्या निष्क्रीयतेवर टीका :- या तक्रारी अनेक वेळा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. कर्मचारी फक्त उडवाउडवीची उत्तरे देतात, ‘उद्या येईल, परवा येईल’ म्हणतात, पण पाणी येत नाही, असे नागरिकांनी सांगितले. नगर परिषदेच्या प्रशासनाला प्रत्येक घराचे पाणी बिल भरले आहे की नाही हे माहीत असते, मात्र कोणत्या भागात पाणी येत नाही हे जाणून घेण्याची प्रशासनाची इच्छाच नाही, अशी तीव्र टीका रहिवाशांनी केली आहे.

प्रत्येक महिन्यात पाणीपुरवठा विस्कळीत :- सुभाषनगरमध्ये महिन्यातून एकदातरी पाणीपुरवठा खंडित होतोच. कधी पंप खराब, कधी वाल्व बंद, तर कधी वीज नसल्याचे कारण देऊन नागरिकांना तहानलेले ठेवले जाते. सुभाषनगरातील नागरिक आता संतापले असून त्यांनी इशारा दिला आहे की, जर पुढील 48 तासांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही,तर आम्ही नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home