देगलूर शहरात ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करण्याची नागरिकांची मागणी
देगलूर/जावेद अहमद :- देगलूर शहरात विवाह प्रमाणपत्रासाठी अद्यापही सुरू असलेल्या ऑफलाइन प्रक्रियेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीं विरोधात आता आवाज उठू लागला आहे. या प्रक्रियेला शक्य तितक्या लवकर ऑनलाइन स्वरूप दिले जावे, अशी मागणी शेख मुजममील अहमउल्ला यांनी उपविभागीय अधिकारी देगलूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या शहरात विवाह प्रमाणपत्र हस्तलिखित पद्धतीने देण्यात येत असल्याने, प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, कार्यालयीन दौरे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र नाकारले जाणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या नागरिकांसमोर निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे देगलूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात सुरू असतानाही, शहरात मात्र अद्याप जुनीच प्रक्रिया कायम आहे. त्यामुळे नवविवाहितांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि खर्चात टपट वाढ होत आहे.
ऑफलाइन स्वरूपातील विवाह प्रमाणपत्र अनेक शासकीय योजनांमध्ये, मतदार नोंदणी, आधार अद्ययावतीकरण, पासपोर्ट तसेच अन्य कागदपत्रांमध्ये मान्य नसल्याने नागरिकांना अर्ज नाकारला जातो. त्यामुळे शासनाच्या डिजिटल सेवा सुलभ करण्याच्या प्रयत्नांना तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
देगलूर शहरात ऑनलाइन Marriage Certificate प्रणाली लागू झाल्यास हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सेवांचा वेग, पारदर्शकता आणि उपलब्धता वाढेल, असा विश्वास अर्जदारासह नागरिकांनी व्यक्त केला आहे..यावेळी शेख इम्रान देगलूरकर, शेख अकबर, मिर्झा युसुफ, सय्यद बबलू, शेख महेमूद, शेख खुर्शीद, सुफियान आदी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home