Tuesday, October 21, 2025

धरण लबालब, तरी नळ कोरडेच !


नगरदेवळा ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह !

पूरानंतरही पाण्याची टंचाई ; सणासुदीला नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी!

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावाने सप्टेंबर महिन्यात तुफान पावसाचा तडाखा सोसला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अग्नावंती नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने धरण अक्षरशः लबालब भरले. मात्र, धरण भरल्याने एकीकडे नदीला दोन वेळा भीषण पूर आला. इतका की मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले आणि व्यवहार पूर्ण ठप्प झाले. पण आज, त्याच गावात दिवाळीसारख्या सणासुदीतही नागरिकांच्या नळाला कोरडाच प्रतिसाद मिळतोय.

पूराचे भय गेले, पण पाण्याचा तुटवडा कायम :- पूर ओसरल्यानंतर गावकऱ्यांना वाटले की आता तरी नळाला वेळेवर पाणी येईल, पण उलटे घडले. उन्हाळ्यासारखेच आता पावसाळ्यानंतरही 5 ते 10 दिवसांनी नळातून पाणी येते. काही घरांमध्ये तर दोन आठवडे पाणी दिसले नाही. धरण लबालब असूनही गावात पाण्याची टंचाई का निर्माण झाली, हा ग्रामस्थांचा ज्वलंत प्रश्न आहे.

 दिवाळीचा आनंद की त्रास ? :- दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा काळ- घराघरात माहेरवाशीण मुली, मुंबई-पुणे, नाशिकहून परतलेले मुलगे, नातवंडांचा गोतावळा अशा वातावरणात पाणीपुरवठा कोसळल्याने नागरिक हैराण आहेत. साफसफाई, फराळ तयारी, स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुणे या सगळ्या गरजांसाठी पाणी आवश्यक असताना ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन न केल्याने सणासुदीचा आनंद त्रासदायक ठरला आहे.

 ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह :- धरण आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ असूनही पाणीपुरवठा नियमित न करणे म्हणजे “निसर्गाचा प्रकोप नव्हे, तर प्रशासनाचे अपयश” असाच निष्कर्ष ग्रामस्थ काढत आहेत. सणासुदीत पाण्याचा पुरवठा वाढविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे नागरिक स्पष्ट सांगतात. “धरण उशाला, पण घसा कोरडा” हीच सध्या नगरदेवळ्याची परिस्थिती आहे.

 गावासाठी दीर्घकालीन उपाययोजना हवी :- ग्रामस्थांच्या चर्चांमध्ये एकच मुद्दा आहे की, अग्नावंती नदी आणि धरण या दोन्हींचा उपयोग जर नीट नियोजनाने झाला, तर नगरदेवळा कधीच दुष्काळी राहणार नाही. धरणाचे खोलीकरण, नदीपात्रात ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे, कृत्रिम तलाव निर्मिती आणि पूरपाण्याचा साठा यासाठी ग्रामपंचायतीने तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

 विकासाच्या शर्यतीत मागे नगरदेवळा :- आधीच नगरदेवळा विकासाच्या दृष्टीने 15-20 वर्ष मागे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात रस्ते, पाणीपुरवठा आणि सुविधा यांच्या बाबतीत अजूनही मोठी पोकळी आहे. आता तरी प्रशासनाने दीर्घकालीन पाणीपुरवठा नियोजन राबवून गावाला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करावे, हीच ग्रामस्थांची मागणी आहे.

धरण भरलं, नदी वाहिली, पण नळ कोरडा", हे नियोजनाचे दिवाळे नाही तर काय ? ज्या गावात पाण्याच्या तुटवड्यामुळे दिवाळी ‘कोरडी’ होते, तिथे विकासाचे चक्र फिरवणार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home