Sunday, October 26, 2025

फलटण डॉंक्टर तरुणी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया!

 


कोणताही दोषी असो - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, त्याला सोडणार नाही ; पण घटनेचे राजकारण करू नका - देवेंद्र फडणवीस

सातारा / प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉंक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले असून, या प्रकरणाने आता राजकीय वादळाचे रूप घेतले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर तीव्र टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव जोडले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - कोणालाही वाचवणार नाही :- मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात योग्य ती आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यास, त्याला सोडले जाणार नाही. परंतु, या घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विरोधकांकडून या दुर्दैवी घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, न्याय मिळवण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील.


* काय आहे प्रकरण ? :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉंक्टरने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तर प्रशांत बनकर याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय, तिच्या तक्रारीत भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांकडून तिच्यावर फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचाही उल्लेख आहे. यामुळे या आत्महत्येच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.


* विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांची बचावात्मक भूमिका :- शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणात माजी खासदारांचा सहभाग असल्याचा दावा करीत, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, सरकार न्याय देण्यास बांधील आहे. परंतु, या घटनेचा राजकीय वापर होऊ नये, कारण हे एका तरुण जीवाचे दु:खद प्रकरण आहे, असे आवाहन केले.


* तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होईल :- मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलिस दलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. फलटण घटनेचा तपास निष्पक्षपणे केला जाईल आणि कोणत्याही राजकीय दबावाला वाव दिला जाणार नाही. राज्य सरकार न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.


* राज्यभरात प्रकरणावर तीव्र चर्चा :- या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. डॉंक्टर संघटना, महिला संघटना आणि नागरिकांकडून ‘न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’ अशी भूमिका घेतली गेली आहे. तर, भाजपविरोधी पक्षांनी या प्रकरणात राजकीय दबाव आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप सुरूच ठेवले आहेत.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home