Tuesday, October 28, 2025

गिरड - सिर्सी रस्त्यावर कार - ट्रकची भीषण धडक

 


* 24 वर्षीय तरुण चालक जागीच ठार, तीन जखमी

* तुळजापूर दर्शनावरून परततांना घडला अपघात 

* वडील, बहीण व दीड वर्षांचा भाचा गंभीर जखमी

नागपूर /  प्रतिनिधी :- दिवाळीच्या भाऊबीजेच्या आनंदावर शोककळा ओढणारी दुर्दैवी घटना गिरड - सिर्सी रस्त्यावर रविवारी रात्री घडली. तुळजापूर दर्शन करून परत येत असलेल्या एका कुटुंबाचा कार अपघातात भीषण मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार 27 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गिरड - सिर्सी मार्गावरील ‘सॅटीस्फॅक्शन बार’ जवळ झाला.


* अपघातात तरुण चालकाचा जागीच मृत्यू :- प्राथमिक माहितीनुसार, एम. एच. 30 ए. झेड. 5192 क्रमांकाच्या एर्टिगा कारने एम. एच. 32 क्यू. 2362 क्रमांकाच्या आयसर ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिमांशू आत्माराम गोन्नाडे (वय 24, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रसंगी सोबत असलेले वडील आत्माराम सोनाजी गोन्नाडे (वय 58), बहीण शिवानी द्रोहीत धकाते (वय माहित नाही), भाचा एशित द्रोहीत धकाते (वय दीड वर्ष)

हे सर्व गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम येथे उपचारासाठी हलविण्यात आले.


* पोलिस व स्थानिकांचा तत्पर बचावकार्य :- घटनास्थळी प्रथम हॉटेल मालक तेजराम पडोळे यांनी सिर्सी पोलिस चौकीला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच बेला पोलिस ठाण्याचे शिपाई ओम राठोड, होमगार्ड स्वप्नील पांडे, पोलिस पाटील विजय गायगवाने (बोथली), चिंटू धोंगडे (मनोरी) आणि इतर सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी ॲम्ब्युलन्सद्वारे हॉस्पिटलला रवाना करण्यात आले,

तर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उमरेड येथे पाठविण्यात आला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र ठाणेदार चेतनसिंह चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. दरम्यान, ट्रक चालक मोहम्मद रफीक मजीद शेख (रा. अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


* उमरेड - गिरड रस्त्याची दयनीय अवस्था :- स्थानिक नागरिकांच्या मते, उमरेड - गिरड - सिर्सी रस्ता हा सतत कोळसा वाहतुकीमुळे खराब अवस्थेत आहे. रस्त्याच्या कडेची भराव नाही, ब्रेकरवर रेडियम मार्किंगचा अभाव आहे. या कारणामुळे अपघातांची मालिका सुरू असून

रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती आणि अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


* एक मेहनती तरुणाचा अंत :- मृत हिमांशू गोन्नाडे हे माजी पोलिस कर्मचाऱ्याचे पुत्र होते. ते तुळजापूर दर्शनावरून धराशिव मार्गे लहान बहिणीला पुण्यास सोडून आरमोरीकडे परतत असताना हा अपघात झाला.

दिवाळीच्या आनंदात बुडालेल कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याने आरमोरी आणि सिर्सी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home