Tuesday, December 30, 2025

खोपोलीत ‘रुबी सी फूड रेस्टॉरंट’ व ‘मिस्टर इराणी चहा हॉटेल’ थाटात सुरू

 


* मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते उद्घाटन ; खवय्यांसाठी सर्व प्रकारच्या डिशेसची खास मेजवानी

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली साजगांव परिसरात सुरू झालेल्या रुबी सी फूड रेस्टॉरंट आणि मिस्टर इराणी चहा हॉटेल या नव्या खाद्य स्टेशनचे उद्घाटन सोमवार, 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.


उद्घाटनप्रसंगी बोलताना मालक मोहम्मद पठाण आणि मोईन पठाण यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या चवीदार डिशेस तसेच पारंपरिक व लोकप्रिय पदार्थांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्जेदार चव, स्वच्छता आणि उत्तम सेवा हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदिपक शेंडे , माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , नवनिर्वाचित नगरसेवक हरीश काळे , विनायक तेलवणे , अनिता श्याम पवार , माजी नगरसेवक कैलास गायकवाड , नासीर पटेल , मनिष यादव , संजय पाटील , सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज पटेल ,आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, बाबु पुजारी, अशपाक भाई , अयाज शेख , शंकर कांबळे, मुजफ्फर पटेल , रामभाऊ पवार यांसह, मोईन मोहम्मद पठाण व मित्र परिवारातील सदस्य नातेवाईक, मित्रमंडळींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


नव्या रेस्टॉरंट व मिस्टर इराणी चहा हॉटेलच्या माध्यमातून खोपोली साजगाव परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून स्थानिकांना दर्जेदार खाद्य सेवा उपलब्ध होणार आहे. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत मालकांना शुभेच्छा दिल्या. चव, स्वच्छता आणि सेवा यांचा संगम साधणारी हे नवे खाद्य स्थळ खोपोलीतील खवय्यांसाठी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.

Monday, December 29, 2025

मंगेश काळोखे हत्या प्रकरण : साईबाबा नगर ते खोपोली पोलिस स्टेशन भव्य कॅन्डल मोर्चा

 

* सर्व आरोपी अटक होईपर्यंत शांत बसणार नाही - आ. थोरवे

* हजारो नागरिकांचा सहभाग ; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर खोपोली व परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला असला, तरी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.


* सोमवारी सायंकाळी भव्य कॅन्डल मोर्चा :- मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता साईबाबा नगर ते खोपोली पोलिस स्टेशन दरम्यान भव्य कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिक, विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. हातात मेणबत्त्या, फलक व घोषणांसह नागरिकांनी शांततेत निषेध व्यक्त केला.




Sunday, December 28, 2025

सर्व आरोपींना अटक न झाल्यास पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

 


* उद्या कॅण्डल मार्च ; मंगेश काळोखे हत्येतील सर्व दोषींना अटक व फाशीची शिक्षा द्यावी - आमदार महेंद्र थोरवे 


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अति तातडीची बैठक घेऊन आंदोलनाचा स्पष्ट इशारा दिला.

बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, साईबाबानगर ते खोपोली पोलिस स्टेशनपर्यंत मंगेशची निर्घृण हत्या झाली, त्या घटनेच्या निषेधार्थ उद्या सायंकाळी पाच वाजता कॅण्डल मार्च काढण्यात येईल. खोपोली हे सांस्कृतिक शहर असून अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. ही लढाई कायदेशीर मार्गांने लढायची असून मंगेशच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


थोरवे यांनी आरोप केला की, आतापर्यंत अटक न झालेल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. मात्र राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असून आरोपींना अटक करू नये, निर्दोष ठरवून बाहेर काढावे असा प्रयत्न सुरू आहे. अशा दबावाला बळी न पडता पोलिसांनी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.


काल एकनाथ शिंदे खोपोलीत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी जाहीरपणे, या प्रकरणातील जे-जे आरोपी सहभागी आहेत, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन दिल्याचे थोरवे यांनी नमूद केले.


आमदार थोरवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सर्व आरोपी उद्यापर्यंत अटक झाले पाहिजेत. अन्यथा परवापासून आम्ही सर्वजण खोपोली पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करू. जोपर्यंत मंगेश काळोखे हत्येतील सर्व आरोपींना अटक होत नाही आणि जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.


या घोषणेमुळे खोपोली शहरात तणावाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले असून, उद्याच्या कॅण्डल मार्चला मोठ्या सहभागाची शक्यता वर्तवली जात आहे.

Saturday, December 27, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली काळोखे कुटुंबीयांची भेट

 


मंगेश काळोखे हत्या प्रकरण : खोपोली प्रकरणाचे राज्यभर पडसाद


* दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खोपोली येथे मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


या भेटीदरम्यान कुटुंबीयांसह परिसरातील महिला व ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.


* ही हत्या माणुसकीला काळिमा फासणारी - एकनाथ शिंदे :- यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंगेश काळोखे यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही हत्या पूर्णतः नियोजनबद्ध असून यामागे कट रचण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सक्षम सरकारी वकील नेमण्यात येईल. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देणे हीच काळाची गरज आहे.


* लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती :- या भेटीच्या वेळी कर्जत - खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, नगरसेवक अमित फाळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शहराध्यक्ष संदीप पाटील, दिनेश थोरवे, अनिल मिंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, हजारो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी भूमिका यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

खोपोली हादरविणाऱ्या खूनाच्या घटनेनंतर पोलिसांची वेगवान कारवाई ; तपासासाठी आठ पथके कार्यरत

 



खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात काल सकाळी घडलेल्या धक्कादायक आणि भिषण घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.


* नागोठणेतून दोन संशयित ताब्यात :- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर या दोन संशयितांना नागोठणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील कट, शस्त्र पुरवठा आणि इतर सहकाऱ्यांची भूमिका उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.


* आठ पोलिस पथके तपासात :- या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. खोपोली, नवी मुंबई, मुंबई, मुंबई विमानतळ परिसर तसेच रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ही पथके तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने आणि आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.


* दहा जणांविरोधात गुन्हा दाखल :- या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा ज्ञात आणि चार अज्ञात आरोपींचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.


* राजकीय वैमनस्याचा प्राथमिक संशय :- मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना (शिंदे गट) कडून निवडून आल्या असून त्या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या सर्व बाबी तपासाअंती स्पष्ट होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


* कठोर शिक्षेची मागणी :- या हत्येमुळे खोपोली शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


* पोलिसांचा निर्धार :- पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले की, या प्रकरणात तपासासाठी आठ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाईल. खोपोली शहराला हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील सर्व दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा देण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Friday, December 26, 2025

खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या...

 


शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा सकाळी निर्घृण खून ; शहर बंदची हाक

खोपोली / मानसी कांबळे - जतीन मोरे :- खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.


शांत, औद्योगिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत खूनासारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती, संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

* शाळेतून परतताना हल्ला :- प्राथमिक माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना विहारी परिसरात, जया बार समोर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून ते फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत मंगेश काळोखे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉंक्टरांनी घोषित केले.


* पोलिस तपास सुरू :- घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती, मोबाईल कॉल डिटेल्स आदी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.


* पोलिस ठाण्यात तणाव :- या घटनेनंतर खोपोली पोलिस ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला. शिवसेनेचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेविका - नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले होते. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.


* शहर बंदची हाक :- या हत्येच्या निषेधार्थ खोपोली शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शहर प्रमुख संदीप पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे का, की निष्पाप माणसाचा जीव जातो ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


* नागरिकांमध्ये संताप :- सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीची अशी हत्या होणे ही केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण शहरावर आघात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. खोपोलीतील ही घटना अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे.


Sunday, December 21, 2025

परिवर्तना'च्या स्वप्नांना हाताने झाडून काढले !


* खोपोली भगवामय, कुलदीपक शेंडे यांचा दणदणीत विजय

* नगराध्यक्षपदी 1,118 मतांनी सरशी ; शिंदे गट 14 जागांसह आघाडीवर, राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान

* शरद पवार गटाचे खाते उघडले, अपक्ष राहुल गायकवाड नगरसेवक झाले

* सुनील पाटील, मसुरकर, पानसरे, सॅम्युअल, रियाज पठाण यांना पराभवाचा झटका 

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होताच शहरात राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, शिवसेना - भाजप - आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचा 1,118 मतांनी पराभव करीत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खोपोलीत भगवामय वातावरण निर्माण झाले आहे.


या लढतीत काँग्रेसचे तौफिक कर्जिकर, आम आदमी पार्टीचे डॉं. रियाज पठाण तसेच पत्रकार किशोर साळुंके यांनी मिळून 1,602 मते घेतली. याशिवाय ऋषिकेश कोंडुसकर (273) आणि पत्रकार अनिल वाघमारे (318) यांनाही लक्षणीय मते मिळाली. या मतविभाजनामुळे मुख्य लढतीतील मतांतील अंतर वाढल्याचे चित्र दिसून आले.


* दिग्गजांना पराभवाचा धक्का :- या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉं. सुनील पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, माजी नगरसेवक किशोर पानसरे, जीनी सॅम्युअल आदी दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवार गटाचे खाते सुवर्णा मोरे यांच्या विजयामुळे उघडले, तर राहुल गायकवाड हे एकमेव अपक्ष नगरसेवक ठरले.


* प्रचारयंत्रणा आणि नेतृत्व :- महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली. बूथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद यांचा पुरेपूर वापर या विजयामागे निर्णायक ठरला. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची ही प्रतिष्ठेची निवडणूक असतानाही प्रचारातील विस्कळीतपणा व नियोजनाचा अभाव मतदारांच्या नजरेतून सुटला नाही, अशी प्रतिक्रिया शहरात उमटली.


* मतदानाचा आढावा :- खोपोली शहरात एकूण 62,074 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 42,448 मतदारांनी नगराध्यक्षपदासाठी मतदानाचा हक्क बजावला. 


* विजयी उमेदवार - प्रभागनिहाय (संक्षेप) :-

प्रभाग 1 : मंगेश दळवी (राष्ट्रवादी), श्रुती पालांडे (शिवसेना-शिंदे)

प्रभाग 2 : अमित फाळे, मानसी काळोखे (दोन्ही शिवसेना शिंदे)

प्रभाग 3 : सुवर्णा मोरे (शरद पवार गट), अनिल सानप (शिवसेना शिंदे)

प्रभाग 4 : विनायक तेलवणे (राष्ट्रवादी), प्रतिक्षा रेटरेकर (भाजप)

प्रभाग 5 : हर्षदा गायकवाड, समीर मसुरकर (राष्ट्रवादी)

प्रभाग 6 : मयुरी शेलार (शिवसेना शिंदे), राहुल गायकवाड (अपक्ष)

प्रभाग 7 : ऐश्वर्या पाटील, प्रशांत शेंडे (दोन्ही राष्ट्रवादी)

प्रभाग 8 : रुपाली जाधव, रुकसाना जळगावकर (दोन्ही शिवसेना शिंदे)

प्रभाग 9 : गणेश सुतक, तसलीम पाटील (दोन्ही शेकाप)

प्रभाग 10 : अनिता पवार, उज्ज्वला महाडिक, हरीश काळे (शिवसेना शिंदे पॅनल)

प्रभाग 11 : सानिया शेख, विक्रम साबळे (दोन्ही भाजप)

प्रभाग 12 : वनिता कांबळे औटी, निजामुद्दीन जलगावकर (दोन्ही शेकाप)

प्रभाग 13 : अविनाश किर्वे, वंदना सावंत (दोन्ही शिवसेना शिंदे)

प्रभाग 14 : रेश्मा गायकवाड (शिवसेना शिंदे), किशोर पाटील (भाजप)

प्रभाग 15 : स्वेला अहिर (राष्ट्रवादी), संदीप पाटील (शिवसेना-शिंदे)

ही निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडीपुरती मर्यादित न राहता, आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची कसोटी ठरली. अखेरीस, मतदारांनी दिलेल्या कौलातून महायुतीच्या नियोजनबद्ध प्रचाराला मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले. खोपोलीत पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा हा निकाल मानला जात आहे.


* नगराध्यक्षपदाचा निकाल :-

कुलदीपक शेंडे : 20,469 मते

डॉं. सुनील पाटील : 19, 351 मते

मताधिक्य : 1,118 


* पक्षनिहाय जागा :-

शिवसेना (शिंदे गट) - 14

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 7

भाजप - 4 

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) - 4

शरद पवार गट - 1

अपक्ष -1







Saturday, December 20, 2025

नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लांबणीवर ; इच्छुकांचा जीव टांगणीला

 


राज्यात झेडपी - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात

* पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांचा समावेश, नगरदेवळा बाहेर


नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी राजकीय धूम पाहायला मिळत होती. इच्छुक उमेदवारांची लांबलचक रांग, पक्षांतर्गत हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरू असतानाच आता ही निवडणूक लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीचा समावेश नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.


दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली होती. शिवसेना (शिंदे गट) कडून नगरदेवळा जिल्हा परिषद गटासाठी रावसाहेब जिभू ऊर्फ मनोहर गिरधर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बाळद पंचायत समिती गणासाठी शीतल सोमवंशी यांचे नाव देखील फायनल करण्यात आले आहे. तर नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अभिलाषा रोकडे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत जोरदार तयारी सुरू केली आहे.


भाजपकडूनही तिकीटासाठी अनेक इच्छुक रिंगणात असून मुन्ना (प्रणय) भांडारकर, रविंद्र पुंडलिक पाटील ऊर्फ रवी बाबा, प्राचार्य किरण काटकर, विलास भामरे, नामदेव भावडू पाटील, सागर पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून रोशन जाधव, सोनू परदेशी, नामदेव विश्राम महाजन हे इच्छुक असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआयचे विविध गट, एमआयएम यांसारखे लहान-मोठे पक्ष तसेच काही अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.


* राज्यात झेडपी - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात :- राज्यातील 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि तीन जिल्हा परिषदांतील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याने एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार असून, उर्वरित निवडणुका न्यायालयाच्या निर्णयानंतरच होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच अहिल्यानगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील 88 पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने तेथेही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


* पहिल्या टप्प्यात ‘या’ 12 जिल्हा परिषदांची निवडणूक :- पहिल्या टप्प्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांतील तसेच त्या जिल्ह्यातील 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील निवडणुका सर्वोच्च न्यायालय यांच्या पुढील आदेशानंतरच घेण्यात येणार आहेत.


* 5 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता :- राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 5 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाण्याची शक्यता आहे. एकूण 21 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, संभाव्य निवडणूक कालावधी 5 ते 27 जानेवारी असा असू शकतो.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे की, आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदांमधील निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीतच पार पडतील, तर उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका पुढील आदेशानुसार घेतल्या जातील.


एकूणच, नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता असली तरी, आधीच तयारीला लागलेल्या उमेदवारांना आपले काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. आता सर्वांचे लक्ष पहिल्या टप्प्यातील निवडणुका आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे.



ग्रीन सिग्नल : निवडणूक आयोगाचा ‘लाडक्या बहिणीं’ना मोठा दिलासा

 


आचारसंहिता लागू असतानाही नोव्हेंबर - डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता ; केवायसीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत


मुंबई / मानसी कांबळे :- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सुरू असून, निवडणुका तीन टप्प्यांत पार पडत आहेत. दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे मतदान पार पडले असून, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या जागांसाठी मतदान शनिवार, 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय महापालिका निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आचारसंहितेमुळे निधी वितरण रखडेल, अशी भीती होती. मात्र आता याच संदर्भात लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित करण्यास कोणताही अडसर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असून, लवकरच हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी लाडकी बहीण योजना ही आधीपासून सुरू असलेली योजना असल्याने तिच्या निधी वितरणावर आचारसंहितेचा प्रतिबंध लागू होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. योजना नवीन नसल्यामुळे तिचे नियमित हप्ते देण्यास कोणतीही अडचण नाही, असे आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, “लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, महापालिका निवडणुकांच्या चार ते पाच दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही महिन्यांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, केवायसी न केल्यास सुमारे 40 ते 50 लाख लाभार्थी योजनेबाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली असून, त्या आधी महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


एकूणच, निवडणूक काळातही निधी वितरणाला मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण असून, आता प्रत्यक्ष पैसे खात्यात केव्हा जमा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



Thursday, December 18, 2025

खोपोलीचा कौल कुणाला ?

 


शिवसेना-भाजप युती आघाडीवर की राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला?

* सत्तासंघर्षाच्या रणांगणात खोपोली ; 70 तासांत राजकीय चित्र स्पष्ट होणार!

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीने केवळ शहरापुरतेच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान झाले आणि त्या दिवसापासून उमेदवार, नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदार सर्वजण एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत...खोपोलीचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार ?

नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 7 उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत ही शिवसेना-भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशीच रंगताना दिसत आहे.


* शेंडे फॉर्म्युला विरुद्ध राष्ट्रवादीची गोंधळलेली रणनीती :- युतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शेंडे यांची उमेदवारी ‘फिक्स’ असल्याची खात्री कार्यकर्त्यांमध्ये होती आणि त्याच आत्मविश्वासातून बुथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद दिसून आली.


याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची ही प्रतिष्ठेची निवडणूक असूनही, प्रचारातील विस्कळीतपणा आणि नियोजनाचा अभाव शहरवासीयांच्या नजरेतून सुटलेला नाही. लोकप्रियतेत आघाडीवर असलेले माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील प्रचारयंत्रणेत मात्र मागे पडले, अशी स्पष्ट प्रतिक्रिया मतदारांकडून ऐकू येते.


आजच्या घडीला जनमताचा सूर पाहता नगराध्यक्षपदावर कुलदीपक शेंडे यांची सरशी संभवते, असे संकेत ठळकपणे मिळत आहेत.


* प्रभागांमध्ये ‘पैसा, प्रतिष्ठा आणि प्रभाव’ यांची लढाई :- खोपोलीतील अनेक प्रभागांत निवडणूक म्हणजे विकास नव्हे, तर प्रतिष्ठा, वर्चस्व आणि ‘अर्थ’शक्तीचा संघर्ष ठरत असल्याचे चित्र आहे.


प्रभाग क्र. 10 हा शीळफाटा परिसरातील सर्वात मोठा प्रभाग चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. साध्या नगरसेवक पदासाठी पाऊण कोटी ते एक कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. येथे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील आणि शिवसेनेचे हरीश काळे यांचे प्रभावक्षेत्र असल्याने, ‘आप’च्या मतांचा कल कुणाच्या बाजूने जातो यावर निकाल अवलंबून आहे.


प्रभाग 3 मध्ये प्रकाश गायकवाड व रेखा जाधव यांच्या मतांवर किशोर पानसरे विरुद्ध अनिल सानप यांची लढत ठरते. प्रभाग 6 मध्ये भाजपचे संजय तन्ना आणि अपक्ष राहुल गायकवाड यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग 5 मध्ये भाजपचे इंदरमल खंडेलवाल आणि राष्ट्रवादीचे समीर मसूरकर यांची थेट लढत रंगतदार ठरली आहे. महिला जागेवरही सोनिया रुपवते (शिवसेना) विरुद्ध हर्षदा गायकवाड (राष्ट्रवादी) यांची प्रतिष्ठेची झुंज आहे.


प्रभाग 7 मध्ये जाधव - शेंडे - पाटील असा त्रिकोणी संघर्ष आहे तर प्रभाग 11 मध्ये भाजपचे विक्रम साबळे यांचा आत्मविश्वास विरुद्ध शेकापची आशा असे चित्र दिसून येत आहे. प्रभाग 12 मध्ये रॉबीन सॅम्युअल विरुद्ध निजाम जलगावकर यांचा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग 14 मध्ये माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर विरुद्ध भाजपचे किशोर पाटील ही लढत मसूरकरांच्या राजकीय वजनाची कसोटी मानली जात आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अत्यंत गंभीर संघर्ष दिसून येत असून काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


* राजकीय नेतृत्वाची खरी परीक्षा :- ही निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडण्यापुरती मर्यादित नाही. ती आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची परीक्षा...ऐनवेळी राष्ट्रवादीकडून डॉं. सुनील पाटील यांना उमेदवारी देणे योग्य ठरले का ? दत्ता मसूरकर यांची राजकीय जादू अजूनही कायम आहे का ? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का ? आम आदमी पार्टी कुणाचे गणित बिघडविणार ? याची उत्तरे शोधणारी... दरम्यान, 21 डिसेंबर, रविवार रोजी मतमोजणीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.


* शेवटचे 70 तास…आणि खोपोलीचा अंतिम फैसला :- शिवसेना - भाजप युतीला 31 पैकी 23 ते 24 जागा मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. पण निवडणूक म्हणजे शेवटच्या मतापर्यंत अनिश्चितता. खोपोलीकरांनी आपला कौल दिला आहे. आता प्रश्न एकच आहे खोपोलीची सत्ता कोणाच्या हाती ? आणि याचे उत्तर अवघ्या काही तासांत खोपोलीकरांना मिळणार आहे.



Wednesday, December 17, 2025

शेडवी फाट्याजवळ वॅगनर कारचा भीषण अपघात

 

जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी घटना ; चार जण जखमी, जीवितहानी टळली

खोपोली / खलील सुर्वे :- जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर शेडवी फाटा येथे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास वॅगनार कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खोपोलीहून मुंबईच्या दिशेने जात असलेली वॅगनार कार (क्रमांक MH 46-BE 1435) भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट मोरी भागात कोसळली, त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने मदतीसाठी जाखोटीया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुशीला कृष्णा ठोंबरे, रिया फाटे, दत्ता चिंधु पाटील हे जखमी झाले असून एका जखमीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

खोपोलीजवळ भीषण अपघात

 


मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाच्या कॉलमला ट्रकची जोरदार धडक ; चालकाचा जागीच मृत्यू

खोपोली / खलील सुर्वे :- मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर बुधवार, 17 डिसेंबर रोजी पहाटे सुमारे 4.35 वाजता एक भीषण अपघात झाला. सी. फॉर. एक्स (C-for-X) ब्लॉकने भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट अमृतांजन पुलाच्या कॉलमला जोरदार धडकला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MH 12 LT 9777 उतारावर येत असताना अचानक ब्रेक फेल झाले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रक थेट अमृतांजन ब्रिजच्या कॉलमवर आदळला. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.

या अपघातात धनंजय दत्तात्रेय घुंडरे (वय 36, रा. देवाची आळंदी) या ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ट्रकमध्ये अडकलेला व छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे उतारावरील जड वाहनांच्या ब्रेक तपासणी व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

नगरदेवळा गावात स्मार्ट मीटर बसविण्यावर वाद ?

 


जोरजबरदस्ती, दमदाटीचे आरोप ; ग्राहकांचे अधिकार व नियम काय ?

* मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला छेद ? महावितरण व ठेकेदारांवर नागरिकांचा सवाल

* मानवाधिकार व ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची मागणी


नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावात सध्या स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगात सुरू असून अनेक ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, काही नागरिकांच्या स्पष्ट हरकती असतानाही स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचे आरोप पुढे आले आहेत. काही ठिकाणी तर “शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करू” असा इशारा महावितरणचे कर्मचारी व ठेकेदारांकडून दिला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे गावात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.


विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व जाहीरपणे “स्मार्ट मीटर बसविण्यात कोणतीही जोरजबरदस्ती किंवा दमदाटी केली जाणार नाही. घरमालक घरी नसल्यास मीटर बसविले जाणार नाहीत” असे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या आदेशांना डावलूनच ठेकेदार व महावितरण कर्मचारी दमदाटी करत आहेत का ? की मग मुख्यमंत्र्यांचेच आदेश वेगळे आहेत, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी 15 ते 20 दिवसांत संपूर्ण गावात ‘साम, दाम, दंड, भेद’ मार्गांने स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश महावितरण व ठेकेदार कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे स्मार्ट /प्रीपेड मीटर बसविणे ऐच्छिक आहे की सक्तीचे ? हा मूलभूत प्रश्न ऐरणीवर आला आहे.

* स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नियम काय सांगतात ? :-

- स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक असल्याचे शासन व ऊर्जा मंत्रालयाच्या अनेक वेळा स्पष्ट केलेल्या भूमिका आहेत.

- ग्राहकाची लेखी / तोंडी संमती नसताना जबरदस्तीने मीटर बसविता येत नाही.

- घरमालक अनुपस्थित असल्यास मीटर बसविणे टाळावे, असेही स्पष्ट निर्देश आहेत.

- मीटर बदलतांना ग्राहकाला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

- मीटर बसवितांना वाद, शिवीगाळ, दमदाटी, सार्वजनिक ठिकाणी तमाशा करणे नियमबाह्य आहे.


* ग्राहकांचे अधिकार काय आहेत ? :- 

महावितरण किंवा ठेकेदारांकडून जोरजबरदस्ती, धमकी, शिवीगाळ झाली तर ग्राहक पोलिसांत तक्रार दाखल करू शकतो. अशा घटनांचे व्हिडीओ / पुरावे असल्यास ते महावितरण प्राधिकरण, ग्राहक न्यायालय व मानवाधिकार आयोग (मुंबई CSTM कार्यालय) येथे लेखी तक्रार स्वरूपात देता येतात. 'शासकीय कामात अडथळा’ हा गुन्हा ग्राहकावर सहजपणे लावता येत नाही, जोपर्यंत ग्राहक हिंसक वर्तन करीत नाही. ग्राहकालाही चारचौघांत अपमान न होता सेवा मिळण्याचा अधिकार आहे. वीज बिल वसुलीचा अधिकार असला तरी दमदाटी, अपमान किंवा गुंडगिरी करण्याचा अधिकार नाही.


* महावितरण कर्मचाऱ्यांवरही नियम लागू :- 

दरम्यान, नगरदेवळा परिसरात काही कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी केवळ हजेरी लावून खासगी कामे करतात, शेतात कामाला जातात, लग्नसराईत फिरतात किंवा कामाच्या वेळेत इतर उद्योग करतात, अशी चर्चा आहे. तसेच, एक कर्मचारी पगार घेतो आणि प्रत्यक्ष काम खासगी वायरमन करतो, असे आरोपही होत आहेत.


जर हे आरोप सत्य असतील तर पाचोरा व जळगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन व डीके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस या मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हजेरी लावून काम न करता शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशीही जोरदार मागणी आहे.


* नागरिकांचीही जबाबदारी :- 

या संपूर्ण प्रकरणात नागरिकांनीही वेळेवर वीज बिल भरणे, थकीत बिले नियमानुसार भरून वाद टाळणे आवश्यक आहे. नियमांच्या चौकटीत राहून हक्क मागणे आणि कर्तव्य पाळणे, हाच योग्य मार्ग असल्याचे जाणकारांचे मत आहे.


महावितरण सार्वजनिक सेवा देणारी शासकीय यंत्रणा आहे की खासगी वसुली करणारी संस्था ? दमदाटी, जोरजबरदस्ती व कथित गुंडगिरीला राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मूक संमती आहे का ? स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार ? हे प्रश्न आता नगरदेवळा गावासह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत.

खालापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना मुंबईतून अटक

* मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील ट्रकमधील चोरी उघड

* मुंबईतील डोंगरी परिसरातून मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात

खालापूर / प्रतिनिधी :- मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर घडलेल्या चोरीच्या घटनेचा यशस्वी छडा लावत खालापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतील डोंगरी परिसरातून आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, या यशाबद्दल खालापूर पोलिसांचे जिल्हा स्तरावर कौतुक होत आहे.


ही कारवाई रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल मेहुल (खालापूर) तसेच पोलिस निरीक्षक सचिन पवार (खालापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जगताप, खालापूर पोलिस व मुंबई पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.


* नेमकी घटना काय होती ? :- 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील माडप बोगद्याजवळ फिर्यादी आपल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH 16 AY 6197) मधून प्रवास करीत असताना, माडप टनेल ते कुंभिवली ब्रिज दरम्यान एका अज्ञात इसमाने चालत्या ट्रकमध्ये चढून चोरी केल्याची घटना घडली. आरोपींनी ट्रकमधील अल्युमिनियम अलॉय इंगोट्स या मालातील 45 नग (एकूण किंमत सुमारे 32,400 रुपये) खाली रस्त्यावर टाकले आणि मागील वाहनाने ते उचलून नेले.


* सीसीटीव्हीच्या आधारे तपास :- घटनेनंतर खालापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे गुन्ह्याचे धागेदोरे मुंबईतील डोंगरी - वाडीबंदर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पो. उपनि. अशोक जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखेने बातमीदारांच्या मदतीने सापळा रचला.


* आरोपी अटक, गुन्ह्याची कबुली :- या कारवाईत अर्जुन शंकर काळे (वय 32, रा. वाडीबंदर, डोंगरी, मुंबई) आणि सोहेल रहीम खान (वय 40, रा. वाडीबंदर, ब्रीजखाली, डोंगरी, मुंबई) हे दोघे चारनळ चौक, डोंगरी येथे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मिळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे संतोष रतन काळे (रा. वाडीबंदर, डोंगरी) आणि ‘उम्मी’ (पूर्ण नाव माहित नाही) अशी सांगितली. मात्र, चोरीचा उर्वरित माल व फरार आरोपींबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने 11 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.


* मुद्देमाल जप्त, पोलिस कोठडी :- आरोपींना न्यायालयात हजर केले असता 16 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली. पोलिस कोठडीदरम्यान चोरीचा माल घासबंदर, माजगाव (मुंबई) येथील भंगार दुकान मालक मोहम्मद मुजफ्फर कलील मिस्री याच्याकडून तसेच गुन्ह्यात वापरलेली इको कार (क्रमांक MH 01 AT 2040) जप्त करण्यात आली आहे.

* दोन आरोपी फरार :- सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन फरार आरोपींचा शोध खालापूर पोलिस घेत आहेत. ही कारवाई मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणारी ठरली असून, खालापूर पोलिसांच्या तत्परता व कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Tuesday, December 16, 2025

ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप

 

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार ; आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा संदेश

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील 80 ते 90 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मिलिंद सोनवणे सर, अनिल काटकर सर, संपत वानखेडे सर, राजपूत सर, परदेशी सर, मुख्याध्यापक गणेश खैरनार सर, योगेश पाटील, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पाळी स्वच्छतेबाबत उघडपणे चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

* पाळी स्वच्छता व आरोग्याबाबत सखोल जनजागृती :- यावेळी विद्यार्थिनींना पाळी (Periods) काळातील स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाळीच्या काळात जुना, अस्वच्छ कपडा वापरल्याने होणारे धोके स्पष्ट करण्यात आले. यामध्ये योनी संसर्ग, पांढरपेशा, पेल्विक इन्फ्लेमेशन (PID), त्वचारोग, दुर्गंधी, मूत्रसंस्थेचे आजार तसेच वंध्यत्वाचा धोका यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तसेच सॅनिटरी पॅड वापरण्याचे फायदे, योग्य पॅडची निवड, पॅड 4 ते 6 तासांनी बदलण्याचे महत्त्व, आहार, मानसिक आरोग्य व शारीरिक काळजी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. “पाळी ही लाजिरवाणी नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे,” हा संदेश विद्यार्थिनींना देत आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.

* नगरदेवळा परिसरासाठी व्यापक आरोग्य संकल्प :- याप्रसंगी बोलताना अभिलाषा भिला रोकडे यांनी महिला व तरुणींच्या आरोग्य व सन्मानासाठी आपली ठाम भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, महिला व तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, सन्मान व आरोग्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा व परिसरातील सर्व गावांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये कॉईन पॅड व्हेंडिंग मशीन बसविणे, सॅनिटरी पॅड वितरण मोहीम, पिरीयड स्वच्छता जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, पॅड डिस्पोज मशीन, गुड टच - बॅड टच जनजागृती शिबिरे आदी उपक्रम राबविण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला.

हे उपक्रम नगरदेवळा, संगमेश्वर, चुंचाळे, पिंपळगाव, बदरखे, निपाणे, मोहलाई, नगरदेवळा सिम, आखतवाडे, नेरी तसेच नगरदेवळा पंचायत समिती गण व नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

* स्वच्छता हीच सुरक्षितता - सुरक्षितता हीच सक्षमता :- पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता वाढल्यास मुलींचा आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारते आणि समाज अधिक सक्षम होतो, असा ठाम विश्वास व्यक्त करीत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनी केले आहे.



शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि मंदिराकडे जाणारे रस्ते अस्वच्छतेच्या विळख्यात

 


नगरदेवळा गावातील पवित्र शनि महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर उघड्यावर शौच ; ग्रामस्थ व भाविकांमध्ये तीव्र संताप

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावातील शनि महाराज मंदिर हे गावासह परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर शनिवारी, शनि अमावस्या तसेच विविध धार्मिक पर्वांच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक शनि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात. मात्र, इतक्या पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते आज अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून, ही बाब गावाच्या आणि मंदिराच्या पावित्र्यावर डाग आणणारी ठरत आहे.

गावातील गणपती दरवाजापासून लक्ष्मण कुंभार यांच्या आव्या (मातीची भांडी तापविण्याची भट्टी) पर्यंतचा मार्ग, तसेच पुढे बुरूजापासून बंधाऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर उघड्यावर शौचामुळे अक्षरशः दुर्गंधीने भरलेला आहे. विशेषतः रोज रात्री आणि पहाटेच्या सुमारास या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर लोक शौचासाठी बसत असल्याने भाविकांना मंदिरात जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

इतकेच नव्हे तर पाण्याच्या टाकीकडून येणारा रस्ता आणि शिंदोळकडून येणारा मार्ग या दोन्ही रस्त्यांवरही उघड्यावर शौचाचा सडा पडलेला दिसून येतो. शेकडो लोकांचे श्रद्धास्थान आणि नगरदेवळा नगरीचे आराध्य दैवत असलेल्या शनि महाराजांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था पाहून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


गावात विविध ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. मात्र, बाजारपेठेतून शनि महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर, गणपती दरवाजाशेजारी शनि महाराजांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार का उभारण्यात येत नाही ? असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. अशा प्रवेशद्वारामुळे मंदिराचा मार्ग ओळखण्यास सोपा होईलच, शिवाय त्या भागाचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेकडेही लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शनि महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता स्वच्छ झाला, तर गावाची साडेसाती संपेल. गावात पुन्हा सुख-शांती नांदेल आणि खुंटलेला विकास पुन्हा वेग घेईल, अशी भावना अनेक भाविक बोलून दाखवत आहेत. मात्र, एवढी गंभीर बाब असूनही ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागला आहे.

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत गावोगावी स्वच्छतेचे धडे दिले जात असताना, श्रद्धास्थानाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांची अशी अवस्था लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. आता तरी संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन उघड्यावर शौच थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते स्वच्छ करावेत आणि भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता येईल यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी होत आहे.

Monday, December 15, 2025

पोलिस यंत्रणा व सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय सहकार्य

 


रायगड / प्रतिनिधी :- समाजातील दुर्लक्षित, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना आधार देणाऱ्या कार्यातून नागरी सामाजिक विकास संस्थेने माणुसकीचे दर्शन घडविणारे एक अत्यंत स्तुत्य सामाजिक कार्य आज यशस्वीरीत्या पार पाडले. खोपोली परिसरातून माणगाव तालुक्यातील विळेगाव भागात भटकत असलेल्या एका निराधार मानसिक रुग्णाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्याला योग्य निवाऱ्यात दाखल करण्यात आले. 


ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम मनचक्षू फाउंडेशनच्या टीमसोबत संयुक्तपणे राबविण्यात आली असून, या कार्यासाठी पोलिस प्रशासनाचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.


* पोलिस प्रशासनाचे तत्पर सहकार्य ठरले निर्णायक :- या रेस्क्यू मोहिमेसाठी मानगाव पोलिस ठाणे आणि खोपोली पोलिस स्टेशन यांनी तत्काळ प्रतिसाद देत आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले. विशेषतः खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिलेले मार्गदर्शन, समन्वय आणि सक्रिय सहभाग संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्यंत निर्णायक ठरले.


तसेच मानगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद तांदळे आणि यशोधन गालींदे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


* स्थानिक नागरिकांची सामाजिक बांधिलकी ठरली प्रेरणादायी :- या संपूर्ण मोहिमेत स्थानिक नागरिक नरेंद्र मामुनकर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि वेळेवर दिलेले सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या मदतीमुळे रेस्क्यू कार्य अधिक सुलभ, सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पार पडले.


* निराधारांना सन्मानाचे जीवन देण्याचा संस्थेचा ध्यास :- नागरी सामाजिक विकास संस्था ही समाजातील निराधार, दुर्लक्षित तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. अशा व्यक्तींना सुरक्षित निवारा, आवश्यक वैद्यकीय उपचार आणि सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


* संस्थापिका वर्षा मोरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती :- या सामाजिक उपक्रमासाठी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका वर्षा राजेश मोरे स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण रेस्क्यू प्रक्रियेवर लक्ष ठेवत होत्या. त्यांच्या तत्पर नेतृत्वामुळे आणि समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यावेळी बोलताना त्यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमांत सहभागी होऊन माणुसकीचा हात पुढे करावा, असे आवाहन ही केले.





भिवपुरी - कारशेट मार्गावरील भरावकाम व उत्खननाबाबत संशयाचे ढग

 


सावरगाव येथील कामाची माहिती मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे RTI अर्ज दाखल

कर्जत / प्रतिनिधी :- भिवपुरी - कारशेट मार्गांच्या कामासाठी सावरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या भरावकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भरावकामासाठी वापरण्यात आलेल्या मुरूम, माती व खडीचे उत्खनन नेमके कुठून करण्यात आले, त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या होत्या का ? तसेच प्रत्यक्षात किती प्रमाणात उत्खनन व भराव करण्यात आला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव (रा. फुलाची वाडी, किरवली, ता. कर्जत) यांनी तहसीलदार कार्यालय, कर्जत येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज दाखल करून सविस्तर माहितीची मागणी केली आहे.


* शासकीय नोंदीप्रमाणे काम झाले का ? :- हे भरावकाम शासकीय नियम व नोंदींनुसार झाले आहे की नाही, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. सार्वजनिक निधी तसेच नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असताना पारदर्शकता राखणे अत्यावश्यक असून, या कामाशी संबंधित सर्व माहिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


* सार्वजनिक निधी व नैसर्गिक संसाधनांचा प्रश्न :- या मार्गांच्या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे नैसर्गिक संपत्तीशी संबंधित असल्याने उत्खनन परवानग्या, रॉयल्टी भरणा आणि प्रत्यक्ष कामाचा हिशोब योग्य पद्धतीने झाला आहे का, याची खातरजमा होणे गरजेचे आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, जर काम नियमबाह्य झाले असेल तर शासनाचे आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


* तहसीलदार कार्यालयाकडून कारवाईची अपेक्षा :- RTI अर्जाच्या आधारे तहसीलदार कार्यालयाने आवश्यक कारवाई करून ठरलेल्या कालावधीत मागितलेली माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे. या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे की, सावरगाव येथील भरावकाम पारदर्शक होते की नियमबाह्य ? RTI मधून खरी माहिती समोर येणार का?

Thursday, December 11, 2025

दाखल्यात गंभीर चुका ; शाळा प्रशासनावर आरोप

 

खोपोलीतील प्राथमिक शाळा क्र. 13 मध्ये चुकीची जन्मतारीख, चुकीचे जन्मस्थळ नोंद

* चुका दुरुस्त न करता पालकांना कामाला लावले जाते - पालकांचा आरोप

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिकेने दिलेल्या मूळ जन्मदाखल्याऐवजी चुकीचे हॉस्पिटल सर्टिफिकेट लावून बालवाडीपासून पुढील शाळेपर्यंत विद्यार्थ्याच्या जन्मतारीख व जन्मस्थळात गंभीर चुका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चुकीमुळे वर्षानुवर्षे पालकांची दिशाभूल होत असून शालेय प्रशासनाकडून दुरुस्ती नाकारल्यामुळे पालकांमध्ये संताप वाढला आहे.

* प्रकरण काय ? :- मुतस्कीम युनूस धतुरे (वय 37, राहणार हाळ खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा खरा जन्मदिनांक 14/09/1989 व जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली असा आहे. परंतु बालवाडी सेविकेने मूळ जन्मदाखला न लावता ‘माहेर हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र’ जोडले, ज्यात आईचे चुकीचे नाव लतीफा मोहम्मद सईद धतुरे, चुकीची जन्मतारीख 11 / 08/ 1988, चुकीची जन्मवेळ 4.20 असे नमूद होते. हीच चुकीची माहिती पुढे युसुफ मेहर अली उर्दू प्राथमिक शाळा क्र. 13 मध्येही नोंदली गेली. विशेष म्हणजे शाळेने विद्यार्थ्याचे जन्मस्थळही चुकीचे लोणावळा पुणे असे नोंदवले आहे.

* शाळा प्रशासन दुरुस्ती टाळत असल्याचा आरोप :- धतुरे यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांना दुरुस्ती करण्याची विनंती केली असता, ही चूक आधीच्या मुख्याध्यापकांनी केली आहे, आम्ही दुरुस्ती करू शकत नाही, तुम्ही गॅझेट करा, असे उत्तर दिले. दुरुस्तीसाठी कोणताही शासन आदेश नसल्याचेही सांगण्यात आले. यावरून पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, चुका शाळेने केल्या…आणि फेऱ्या पालकांच्या का ? पगार शाळा व शिक्षकाला…त्रास विद्यार्थ्यांना का ?

* पालकांचा शपथपत्राद्वारे दावा :- पालकांनी शपथपत्रावर स्पष्ट नोंदवले आहे की, जन्मदिनांक 14/09/1989 व वेळ 6.20, तर आईचे नाव नूरजहाँ युनूस धतुरे, वडिलांचे नाव युनूस इस्माईल धतुरे, जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली हेच बरोबर आहे. पालकांनी योग्य माहितीचे पुरावे जोडून शालेय दाखल्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

* बर्‍याच विद्यार्थ्यांचे दाखले चुकीचे असल्याची माहिती :- या शाळेतून असे अनेक चुकीचे जन्मदाखले दिल्याचेही स्थानिकांकडून समोर येत आहे. यामुळे पुढील प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, पासपोर्ट, आधार-पॅन लिंकिंग यासह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गंभीर अडचणी येऊ शकतात.

* प्रशासनाकडून तपासाची मागणी :- स्थानिक नागरिकांनी शाळेतील दाखला प्रक्रिया, जन्मदाखल्यांची नोंद, बालवाडी ते प्राथमिक शाळा दस्तऐवज पडताळणी यावर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.





अलिबाग जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहात साजरा

 


कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती

रायगड / प्रतिनिधी :- मा. मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग आणि अलिबाग जिल्हा कारागृह (वर्ग 2) यांच्या संयुक्त समन्वयाने 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन अलिबाग जिल्हा कारागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण, मूलभूत अधिकार आणि त्यासंबंधीची जनजागृती करण्यात आली.

* बंद्यांच्या हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन :- कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ ॲंड. मानसी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, दरवर्षी 10 डिसेंबर रोजी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश बंद्यांचे मूलभूत अधिकार जपणे आणि त्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आहे. यावेळी त्यांनी बंद्यांना समान प्रतिष्ठा, न्याय्य वागणूक तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे व कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तक्रार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

* समानतेचा व मानवतेचा संदेश :- यावेळी ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग, श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी मानवाधिकारांचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. तुरुंगातील दैनंदिन अडचणींवर मात कशी करावी, बंद्यांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी, तसेच समता व मानवतेच्या आधारे मिळणाऱ्या वागणुकीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

* पुरुष व महिला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- या कार्यक्रमास 173 पुरुष व महिला बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अशा उपक्रमांमुळे कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

* उच्चस्तरीय मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन :- हा कार्यक्रम अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, वारके (भा.पो.से.) तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह (दक्षिण विभाग), भायखळा, योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली.

कार्यक्रमास अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, विशाल बांदल, ॲंड. ए. डी. पाटील (उपाध्यक्ष), ॲंड. अमित देशमुख (सचिव), ॲंड. राजेंद्र माळी (खजिनदार) वकील बार असोसिएशन अलिबाग, ॲंड. शेखर कामथे (मुख्य लोक अभिरक्षक), ॲंड. निलोफर शेख, ॲंड. तन्मय म्हात्रे (सहाय्यक लोक अभिरक्षक), श्रीमती नितल म्हात्रे (लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), ॲंड. विकास पाटील, ॲंड. हिना तांडेल, ॲंड. आदित्य कांबळे, ॲंड. पुनम राजंळकर (विधी स्वयंसेवक) तसेच कारागृह अधिकारी किशोर वारगे (तु.अ. श्रेणी 2), कुटे (सुभेदार), वाणी, वाघमारे (शिपाई) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, December 10, 2025

कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ ?

 



महिला कर्मचाऱ्याकडून अरेरावी व अपमानास्पद वागणुकीचा नागरिकांचा आरोप ; चौकशीची मागणी

कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- कर्जत प्रशासकीय भवन परिसरात वाहन पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, मुख्य गेटवर नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्य नागरिकांशी अपमानास्पद, अरेरावीपूर्ण वर्तन करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही नियुक्ती अधिकृत आहे की अनधिकृत ? पार्किंग शुल्क वसुली कोणत्या नियमाअंतर्गत केली जात आहे ? कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ सुरू झाली आहे का ? असे सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.


* प्रशासनिय भवन कुणाची मालमत्ता ? :- प्रशासकीय भवनात दररोज तहसील, प्रांत, महसूल व अन्य शासकीय कामासाठी शेकडो नागरिक येत असतात. अनेकजण स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काही बस, रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करून कार्यालयात पोहोचतात. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून “पार्किंगचे पैसे द्या, नाहीतर वरिष्ठांना तक्रार करीन”, “मी यूपी-बिहार वरून आलेली नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य करीत धमकावले जात असल्याचा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्यावर करण्यात येत आहे.


या महिला कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांनाही नियम शिकवले जात असून, अपमानास्पद टोमणे मारले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

* महिला कर्मचारी कुणाच्या आदेशाने नियुक्त ? :- कर्जत प्रशासकीय भवनाच्या मुख्य गेटवर असलेली ही महिला कर्मचारी तहसील कार्यालयामार्फत नियुक्त आहे की प्रांत कार्यालयामार्फत ? राज्य शासनाच्या शासकीय कर्मचारी नियुक्ती निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे का? संबधित महिलेला शासकीय पगार व शासकीय सोयी-सवलती तहसिलदार व प्रातं कार्यालय मिळवून देत आहे का ? की ही खाजगी स्वरूपाची नियुक्ती आहे ? जर ती अधिकृत असेल, तर पार्किंग शुल्क आकारण्याचा शासनाचा आदेश, परिपत्रक किंवा नियम लागू करण्यात आला आहे का ? या ठिकाणी सशुल्क पार्किंग असा फलक आहे का ? संबधित पार्कींग ठेकेदारीतून देण्यात आली असेल तर ठेकेदार कौन ? ही नियुक्ती प्रातांधिकारी अथवा तहसीलदार यांनी केली असेल तर पार्कींगचे पैसे तहसिलदार किंवा प्रातांधिकारी घेणार की शासनाच्या तिजोरीत जमा करणार का ? पार्कींगची रितसर पावती मिळणार का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. काही नागरिकांनी तर “ नागरिकांनी प्रशासकीय भवनात कामे घेवून येऊ नये यासाठीच ही नियुक्ती केली आहे का ? ” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

* याआधीही वादग्रस्त वर्तनाचा इतिहास ? :- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच महिला कर्मचाऱ्याच्या वादग्रस्त वर्तनामुळे यापूर्वी जुने तहसील कार्यालय येथे तत्कालीन तहसीलदार शितल रसाळ साहेबांनी तिला कामावरून घरी पाठवले होते, अशी माहितीही समोर येत आहे. तरीही पुन्हा अशाच स्वरूपात तिची नियुक्ती कशी करण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


* शासकीय मालमत्ता जनतेचीच - नागरिकांचा रोष :- कर्जत व खालापूर तालुका हा डोंगराळ तसेच औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक शासकीय कामासाठी येतात. शासकीय जमीन व इमारती या जनतेच्या आहेत आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे संविधानातील कलम 21 च्या चौकटीत जनतेचे सेवक आहेत. त्यांना मिळणारा पगार, भत्ते व सुविधा या नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून मिळतात, याचा विसर संबंधित अधिकाऱ्यांना पडला आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

* तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा :- संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्याला त्वरित हटवावे, बेकायदेशीर पार्किंग वसुली थांबवावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी होत आहे.


अन्यथा यापुढे अशाच प्रकारे नागरिकांचा अपमान आणि अरेरावी सुरू राहिल्यास रायगड जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.



मधु कांबीकर : लोककलेपासून राष्ट्रीय गौरवापर्यंतचा संघर्ष, साधना आणि सर्वोच्च अभिनयाचा प्रवास

 


मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, जे केवळ अभिनय करीत नाहीत तर जगलेले आयुष्यच पडद्यावर साकार करतात. मधु कांबीकर (मधु वामन जाधव) हे असेच एक बहुआयामी, संघर्षशील आणि अत्युच्च अभिनयशैलीचे नाव आहे. मधु कांबीकर ही नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री आहे, असा गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात काढला, हेच त्यांच्या प्रतिभेची पोच दाखवणारे आहे.

* बालपण आणि लोककलेची पायवाट :- 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी शिक्षणाची सुरुवात मालेगाव येथेच केली. पुढील शिक्षण कांबी या गावात झाले. अवघ्या 11 व्या वर्षी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले, तर वयाच्या 13-14 व्या वर्षी गुरू पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या सान्निध्यात लावणी नृत्याची साधना सुरू झाली. येथूनच त्यांच्या लोककलेच्या तपश्चर्येला सुरुवात झाली.

* रंगभूमीवरील पहिली ठळक ओळख :- चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना ‘पुत्रकामेष्टी’ (1980) या नाटकात संधी दिली. लोककलावंत म्हणून त्यांची अवहेलना झाली, तरी प्रभाकर पणशीकर वडीलकीच्या नात्याने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या नाटकातील अभिनयासाठी मधू कांबीकर यांना ‘नाट्यदर्पण - विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला. पुढे ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा 19 नाटकांमधून त्यांनी सशक्त भूमिका साकारल्या.

* 'शापित’ आणि अभिनयाची सिद्धी :- 1982 साली आलेला ‘शापित’ हा चित्रपट मधू कांबीकर यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला. ‘बिजली’ ही ग्रामीण, शोषित व वेठबिगार स्त्री - अक्षमतेपासून सक्षमतेपर्यंतचा तिचा प्रवास त्यांनी अस्सल वास्तवतेने उभा केला. या भूमिकेसाठी त्यांना 1983 - महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यामुळेच त्यांची अभिनयक्षमता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने मान्य केली.

* सतत आव्हानात्मक भूमिका :- 'राघू मैना’, ‘हेच माझे माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’ या चित्रपटांतून मातृत्व, संघर्ष, लोककलावंताची वेदना आणि स्त्रीजीवनाचा प्रवास त्यांनी प्रभावीपणे मांडला. ‘हेच माझे माहेर’ मधील ‘शकू’साठी त्यांना 1985 चा राज्य पुरस्कार, तर ‘रावसाहेब’ साठी 1996 चा राज्य पुरस्कार मिळाला.

* मराठीपलीकडेही अव्वल ठसा :- 1999 साली गुजराती ‘साद’ चित्रपटातील संवादरहित अभिनयासाठी त्यांना गुजरात राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला, हा त्यांच्या अभिनयाच्या जागतिक दर्जाचा पुरावा होता. 'आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘संघर्ष जीवनाचा’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांना राज्य पुरस्कार मिळाले.

* लोककलेचे संवर्धन - मधूप्रीतम :- 1996 मध्ये त्यांनी ‘मधुप्रीतम’ संस्थेची स्थापना करून ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक लावणीचे जतन, संशोधन व सादरीकरण केले. याशिवाय ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान’ स्थापन करून लोककलेप्रती आपली निष्ठा जपली.

* आजचे वास्तव - भावनिक पण प्रेरणादायी :- 2016 मध्ये रंगमंचावर असतानाच आलेल्या पक्षाघातानंतर त्यांचे आयुष्य स्थिर झाले. आज त्या बोलत वा हालचाल करीत नसल्या, तरी घरात चित्रपट सुरू झाला की त्यांच्या डोळ्यातून अश्रू किंवा चेहऱ्यावर हसू उमटते, असे त्यांच्या सुन शीतल जाधव सांगतात - हेच त्यांच्या कलेशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवते.

* मराठी सृष्टीतील अढळ स्थान :- लोकनाट्य, नाटक, दूरदर्शन, चित्रपट आदी सर्व माध्यमांत सातत्य, दर्जा आणि आत्मिक अभिनय जपत मधु कांबीकर यांनी मराठी सृष्टीत एक अढळ मानाचे स्थान निर्माण केले आहे. 2018 साली मिळालेला झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान आहे.

मधु कांबीकर म्हणजे अभिनय नाही, तो अनुभव आहे, संघर्ष आहे आणि मराठी मातीचा आवाज आहे.


संकलन - मानसी गणेश कांबळे 

(संपादक - माय कोकण न्यूज 24) 


Tuesday, December 9, 2025

नेरळ गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

 


रायगड पोलिसांचे मोठे यश ; गावठी कट्टा, राऊंड व मोटारसायकल जप्त

नेरळ / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गुजरात व नाशिक परिसरातून शिताफीने अटक केली आहे.


सदर गुन्हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी घडला असून, 25 नोव्हेंबर 2025 रोजी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 109, 126(2), 351(2), 3(5) तसेच भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 3 व 25 लावण्यात आले आहेत.


* पूर्ववैमनस्यातून गोळीबार :- फिर्यादी सचिन अशोक भवर (वय 40, रा. धामोते - नेरळ) हे बदलापूर येथून कामावरून स्कुटीवर घरी जात असतांना, धामोते येथील पेशवाई रोडवर आरोपींनी संगनमताने सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) वरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीला अडवून त्यांच्यावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे.


* आरोपींची अटक :- अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश जगन्नाथ मार्के (वय 45) सध्या रा. नेरळ, मूळ रा. खडकी, कोपरगाव (जि. अहिल्यानगर), दीपक विनायक कोळेकर (वय 40) रा. हिरावाडी, नाशिक.

विशेष म्हणजे, आरोपी अविनाश मार्के हा संगमनेर पोलिस ठाण्यातील खून प्रकरण (गु.र.नं. 72/2020) मधील फरार आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी व आर्म ऍक्ट अंतर्गत 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रमांक दोनवरही खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.

* संयुक्त पथकाची कारवाई :- हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि आरोपी फरार असल्याने, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार नेरळ व कर्जत पोलिस ठाण्याची संयुक्त तपास पथके स्थापन करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गुजरात व नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र आरोपी वारंवार वास्तव्य बदलत असल्याने तपास आव्हानात्मक ठरत होता.

अखेर तपास पथकाने नाशिक परिसरात सलग आठ दिवस तळ ठोकून पाठलाग करीत 5 डिसेंबर 2025 रोजी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे.

* हत्यारे व वाहन जप्त :- आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, जिवंत काडतूस (राऊंड), सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे (नेरळ), पो. उपनि. सुशिल काजरोळकर (नेरळ), पो. उपनि. सुशांत वरक (कर्जत) तसेच पोलिस अंमलदार स्वप्निल येरुणकर, सचिन वाघमारे, आर. बी. केकाण, आश्रुबा बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी बजावली.

या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून, पुढील तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



Monday, December 8, 2025

खोपोलीत दत्तजयंती उत्सव भक्तीभावात साजरा

 


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांची दत्तगुरूंच्या चरणी सदिच्छा व प्रार्थना

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात दत्त जयंतीनिमित्त गुरुवार, 4 डिसेंबर 2025 रोजी भक्तीमय आणि श्रद्धेचा माहोल अनुभवायला मिळाला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या सामूहिक घोषणांनी शहरभर वातावरण पावन झाले होते. पहाटेपासूनच भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरांत गर्दी केली होती.

या पावन पर्वानिमित्त महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी शहरातील विविध भागांत आयोजित दत्तजयंती उत्सवस्थळी भेट देत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. दर्शनावेळी दत्तगुरूंच्या चरणस्पर्शाने अंतःकरणात शांती, श्रद्धा आणि अध्यात्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दर्शनप्रसंगी कुलदीपक शेंडे यांनी खोपोली शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना केली. शहराचा विकास, नागरिकांमधील ऐक्य आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, अशीही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.

दत्तजयंतीच्या निमित्ताने शहरभर आरती, भजन, दत्तमालेचे पठण, धार्मिक प्रवचने आणि दीपप्रज्वलन अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहर भक्तीरसात न्हाल्याचे चित्र दिसून येत होते.

दत्तजयंती उत्सवामुळे खोपोलीत धार्मिक एकात्मता, सांस्कृतिक परंपरा आणि अध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव श्रद्धा व आनंदात साजरा केला.

खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : मतमोजणीपूर्व सुरक्षा तयारीचा आढावा

 


मुख्याधिकारी पंकज पाटील यांची स्ट्रॉंग रूमला भेट ; 24 तास CCTV, अग्निशमन व कडक सुरक्षा व्यवस्थेची खात्री

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्व सुरक्षा व्यवस्था, पारदर्शकता व विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी नुकतीच मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात असल्याची त्यांनी खात्री करून घेतली.

या भेटीदरम्यान पाटील यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख सुरू असल्याची तपासणी केली. संपूर्ण परिसरातील हालचालींवर थेट नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत व कार्यरत असल्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ सुरू होणाऱ्या पॉवर बॅकअप (बॅटरी) व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था अथवा अन्य सुरक्षायंत्रणा बंद पडू नये, यासाठी संपूर्ण बॅकअप प्रणाली सज्ज असल्याची खात्री करण्यात आली.

अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने फायर फायटिंग प्रणाली पूर्णतः कार्यरत असून, फायर फायटर पथक 24 तास तैनात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच एबीसी (ABC) अग्निशमन सिलिंडरची पुरेशी उपलब्धता, तसेच अग्निशमन सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी पाळीपद्धतीने 24 तास तैनात असल्याचीही तपासणी पाटील यांनी केली. स्ट्रॉंग रूम परिसरात अधिकृत स्वाक्षरी नोंदणी, कडक प्रवेश तपासणी व प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू असल्याचे आढळून आले.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना 24 तासांत कोणत्याही वेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मतमोजणीपूर्व संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, खोपोली येथे पार पडणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय व सुरक्षाविषयक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, पोलिस विभाग, निवडणूक शाखा व सुरक्षा यंत्रणा पूर्ण समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत, नियोजनबद्ध आणि पूर्णतः निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




Saturday, December 6, 2025

मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानातील GR वर राज्यभर संताप..

 

“आंधळं दळतोय… आणि कुत्रं पीठ खातोय!”
ग्रामपंचायतींना आर्थिक गर्तेत ढकलणारा शासनाचा निर्णय?


खालापुर/प्रतिनिधी :- राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान’ अंतर्गत घरपट्टी, पाणिपट्टी आणि दिवाबत्ती करांच्या थकबाकीवर 50% सूट देण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्याने गावोगाव प्रचंड खळबळ उडाली आहे.     


             राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील ज्या निवासी मालमत्ताधरकांनी मालमत्ता कर, पाणीपटटी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या (सन २०२५-२०२६ या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह, दिनांक १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या ५०% रक्कम मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंमलबाजवणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस ५०% सवलत राहील. (म्हणजेच सन २०२५-२०२६ च्या पूर्ण करांची रक्कम + दिनांक १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या करांची एकूण थकबाकी मिळून येणा-या रकमेचा ५०% रक्कम) . कागदावर हा निर्णय लोकाभिमुख वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तो ग्रामपंचायतींच्या अर्थसंकल्पावर आणि गावांच्या विकासावर प्रचंड ताण आणणारा ठरू शकतो, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.


या GR मधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सरकारने सवलतीची घोषणा केली असली तरी त्या सवलतीमुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी झाले, तर त्या नुकसानीची भरपाई शासन करणार नाही. म्हणजेच, सवलत सरकारची… आणि तिची किंमत गावाने भरायची! यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अनेक नागरिकांनी हा निर्णय थेट अन्यायकारक असल्याचे सांगत विचारलं आहे की, “वेळेवर कर भरून प्रामाणिकपणे गावाचा विकास करणाऱ्यांनी काय चुकीचं केलं? आणि वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्यांनाच बक्षीस का दिलं जातंय?”


गावकऱ्यांचा सूर आता आक्रमक होत चालला आहे. चहाटळ्यांपासून ते ग्रामसभांच्या दालनात एकच वाक्य वारंवार ऐकू येत आहे—

“आंधळं दळतोय… आणि कुत्रं पीठ खातोय!”

मेहनत करून वेळेवर कर भरणाऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना सूट देण्याची ही कल्पना गावकऱ्यांना मान्य नाही. शासनाचे हे धोरण सर्वांगीण विकासाच्या नावाखाली ग्रामपंचायतींची कंबर मोडणारे असल्याची भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

ग्रामपंचायतींच्या दैनंदिन व्यवहारात कर वसुलीचा वाटा महत्त्वाचा असतो. स्वच्छता, पाणीपुरवठा, गटारी, रस्ते, वीजबिल, कर्मचाऱ्यांचे मानधन या सर्व कामांसाठी दरवर्षी लाखो रुपयांची गरज भासते. आता या उत्पन्नावरच 50% सूट लादल्यास अनेक गावांमध्ये विकासकामे ठप्प होण्याची शक्यता अधिक आहे. शासनाने सवलत जाहीर करून गावांच्या तिजोरीतला पाया खचवण्याचे काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

यापुढे अधिक गंभीर बाब म्हणजे, हा निर्णय स्वीकारायचा की नाकारायचा याची मुभा ग्रामसभेला दिली असल्याचे दिसते. पण ही ‘मुभा’ही प्रत्यक्षात दबावाचे साधन बनू शकते. शासनाचा आदेश एका बाजूला आणि ग्रामपंचायतींची आर्थिक वास्तविकता दुसऱ्या बाजूला या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधणे ग्रामसभेसाठी कठीण होणार आहे. स्वीकारला तर आर्थिक धोका, नाकारला तर सरकारी बोजा अशा अडचणीत ग्रामपंचायतींना ढकलले जात आहे.

या GR ने निर्माण केलेल्या परिस्थितीकडे पाहता गावकऱ्यांची नाराजी केवळ प्रशासनिक स्तरावर नाही, तर भावनिक पातळीवरही उफाळून आली आहे. “शासन निर्णय घेताना गावांचा विचार करते की केवळ आपली प्रतिमा?” हा प्रश्न थेट विचारला जात आहे. गावकऱ्यांना वाटते, सरकारने सवलतीचा ढोल पिटत स्वतःची लोकप्रियता वाढवायची आणि त्यासाठी गावांचा आर्थिक गळा आवळायचा ही पद्धत योग्य नाही.

एकूणच, शासनाचे हे धोरण जाहीर झाल्यापासून गावोगाव एकच चर्चा

“सवलतीची जाहिरात सरकारची… पण दिवे विझण्याची वेळ ग्रामपंचायतीवर!”

ग्रामपंचायतींच्या तिजोरीत भोक पाडणारा हा निर्णय पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

Friday, December 5, 2025

वनवे येथे श्रद्धेच्या उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव संपन्न

 

* सामुदायिक काकड आरती, भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती


खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील वनवे - निंबोडे तसेच खालापूर दहिवली तर्फे बोरेटी, बीड खुर्द आणि खोपोली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या संपूर्ण परिसरात दिवसभर अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

* पहाटे काकड भजनाने उत्सवाची सुरुवात :- 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत सामुदायिक काकड भजन आरती पार पडली. पहाटेपासूनच गावात भक्तिमय निनाद घुमत होता आणि अनेक भाविकांनी उपस्थित राहून या आरतीचा लाभ घेतला.


* संगीत भजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद :- सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळ, कुंभिवली व आषाढी वारी पंढरपूर ग्रुप यांच्या वतीने संगीत भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.


* महाप्रसादाने भाविकांची सेवा :- दुपारी 12 ते 1 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

हा महाप्रसाद खालापूरचे व्यापारी शामसुंदर शेठ जाखोटिया यांच्या वतीने देण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

* दुपारनंतर कीर्तन, हरिपाठ आणि जागर भजन :- दुपारी 4 ते 6 युवा कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज राणे यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.


सायंकाळी 6 ते 7 वनवे - निंबोडे व खालापूर परिसरातील भाविकांनी सामुदायिक हरिपाठ केला.

संध्याकाळी 7 ते 9 दुसरा महाप्रसाद भरतशेठ सोनी, खोपोली यांच्या वतीने देण्यात आला.

रात्री 9 ते 10 वनवे - निंबोडे व खालापूर समूहाने जागर भजन सादर केले.


* पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता :- रात्री 10.30 ते 11.30 दरम्यान उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. टाळ - चिपळे, भजन, दत्त जयघोष यांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.


* 44 वर्षांची परंपरा आजही सुरू :- हा दत्त जन्मोत्सव गेली 44 वर्षे अविरतपणे पार पडत असून वैकुंठवासी काशिनाथ बाबा नाटे यांची प्रेरणा, गुरुदादा महाराज राणे यांचे मार्गदर्शन, परशुराम खंडू पार्टी यांची दैवी प्रेरणा आणि वैकुंठवासी ह. भ. प. सदाशिव पार्टी यांच्या कार्यविस्तारामुळे हा सोहळा आजही अतिशय भव्यतेने साजरा केला जात आहे. यावेळी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाला गौरव प्राप्त करून दिला. 


Wednesday, December 3, 2025

बोरिवली आणि खोपोली येथे साजरा होणार श्री दत्तजयंती उत्सव

 


खालापुर/प्रतिनिधी :- सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी स्थापन केलेल्या "ओम सद्गुरू प्रतिष्ठान" या परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी महाराज यांच्या बोरिवली आणि खोपोली येथील स्थानांवर यंदाचा श्रीदत्तजयंती उत्सव मार्गशीर्ष १५ शके १९४७ म्हणजेच गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. श्रीदत्तजयंती निमित्त दोन्ही स्थानांवर सकाळी महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात येईल.


ओम सद्गुरु प्रतिष्ठान, मोगलवाडी, खोपोली येथे सकाळच्या सत्रात प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांची महापूजा, रुद्राभिषेक पवमान सूक्तपठण संपन्न होईल तसेच संध्याकाळच्या सत्रात सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर तथा आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या अमृतवाणीत होणाऱ्या श्रीदत्तजन्म अध्यायाचे वाचन व नंतर "नमो गुरवे वासुदेवाय" या नामजपाचा गजर याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल. संध्याकाळी ७.२५ वाजता स्वामी महाराजांची आरती होईल. 

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आरती नंतर रात्री ८.१५ वा. होणाऱ्या स्वामी महाराजांचा पालखी सोहळा! या पालखी सोहळ्यानंतर दर्शन, तीर्थ व महाप्रसाद होऊन या उत्सवाची सांगत होईल.  

या उत्सवाला जास्तीत जास्त भक्तांनी हजेरी लावून प प श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे व सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांचे आशीर्वाद प्रदान करून घ्यावेत असे विनम्र आवाहन विश्वस्तांनी व अश्र्वपरीस फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष इशिका शेलार यांनी केले आहे.

Monday, December 1, 2025

स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया जाहीर

 


डिसेंबरला स्ट्राँग रूम सील, 3 डिसेंबरला मतमोजणीसाठी उघडणार - पारदर्शकतेला प्राधान्य


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या मतदान प्रक्रियेला वेग येत असताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे स्ट्राँग रूम संदर्भातील महत्त्वाची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) सुरक्षितपणे साठवणे, त्यांची सीलबंद प्रक्रिया आणि मतमोजणीपूर्व उघडणी हे सर्व टप्पे पूर्ण पारदर्शकतेने आणि उमेदवार / प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत.


* स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रियेचे वेळापत्रक :- स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 (मंगळवार) रात्री साधारण 10 वाजता (मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर) सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली, स्ट्राँग रूम उघडणे...या प्रक्रियेस सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. EVM स्ट्राँग रूममध्ये ठेवताना सील कशा प्रकारे लावली जाते हे संबंधितांना प्रत्यक्ष पाहता येईल.


मतमोजणीकरीता 3 डिसेंबर 2025 (बुधवार) सकाळी 9.30 वाजता सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी नियोजित वेळी अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी स्ट्राँग रूम उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. हा टप्पा निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून पूर्ण पारदर्शकतेने राबविला जाणार आहे.


* उमेदवार व प्रतिनिधींसाठी महत्त्वाच्या सूचना :- उपस्थित राहणाऱ्यांकडे वैध ओळखपत्र असणे अनिवार्य, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक, स्ट्राँग रूम परिसरात अनावश्यक गर्दी, गोंधळ किंवा नियमभंग टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया निवडणुकीतील शुचिता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


* लोकशाही बळकट करण्याचा निर्णायक टप्पा :- या अधिसूचनेमुळे खोपोली नगर परिषद निवडणुकीतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक दृढ होणार असून, नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास आणखी वृद्धिंगत होईल. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही शंकेस तोंड न देता निष्पक्षपणे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प या सूचनेतून स्पष्ट होत आहे.