वनवे येथे श्रद्धेच्या उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव संपन्न
* सामुदायिक काकड आरती, भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील वनवे - निंबोडे तसेच खालापूर दहिवली तर्फे बोरेटी, बीड खुर्द आणि खोपोली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या संपूर्ण परिसरात दिवसभर अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
* पहाटे काकड भजनाने उत्सवाची सुरुवात :- 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत सामुदायिक काकड भजन आरती पार पडली. पहाटेपासूनच गावात भक्तिमय निनाद घुमत होता आणि अनेक भाविकांनी उपस्थित राहून या आरतीचा लाभ घेतला.
* संगीत भजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद :- सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळ, कुंभिवली व आषाढी वारी पंढरपूर ग्रुप यांच्या वतीने संगीत भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
* महाप्रसादाने भाविकांची सेवा :- दुपारी 12 ते 1 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा महाप्रसाद खालापूरचे व्यापारी शामसुंदर शेठ जाखोटिया यांच्या वतीने देण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
* दुपारनंतर कीर्तन, हरिपाठ आणि जागर भजन :- दुपारी 4 ते 6 युवा कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज राणे यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
सायंकाळी 6 ते 7 वनवे - निंबोडे व खालापूर परिसरातील भाविकांनी सामुदायिक हरिपाठ केला.
संध्याकाळी 7 ते 9 दुसरा महाप्रसाद भरतशेठ सोनी, खोपोली यांच्या वतीने देण्यात आला.
रात्री 9 ते 10 वनवे - निंबोडे व खालापूर समूहाने जागर भजन सादर केले.
* पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता :- रात्री 10.30 ते 11.30 दरम्यान उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. टाळ - चिपळे, भजन, दत्त जयघोष यांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.
* 44 वर्षांची परंपरा आजही सुरू :- हा दत्त जन्मोत्सव गेली 44 वर्षे अविरतपणे पार पडत असून वैकुंठवासी काशिनाथ बाबा नाटे यांची प्रेरणा, गुरुदादा महाराज राणे यांचे मार्गदर्शन, परशुराम खंडू पार्टी यांची दैवी प्रेरणा आणि वैकुंठवासी ह. भ. प. सदाशिव पार्टी यांच्या कार्यविस्तारामुळे हा सोहळा आजही अतिशय भव्यतेने साजरा केला जात आहे. यावेळी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाला गौरव प्राप्त करून दिला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home