Friday, December 26, 2025

खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या...

 


शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा सकाळी निर्घृण खून ; शहर बंदची हाक

खोपोली / मानसी कांबळे - जतीन मोरे :- खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.


शांत, औद्योगिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत खूनासारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती, संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

* शाळेतून परतताना हल्ला :- प्राथमिक माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना विहारी परिसरात, जया बार समोर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून ते फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत मंगेश काळोखे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉंक्टरांनी घोषित केले.


* पोलिस तपास सुरू :- घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती, मोबाईल कॉल डिटेल्स आदी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.


* पोलिस ठाण्यात तणाव :- या घटनेनंतर खोपोली पोलिस ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला. शिवसेनेचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेविका - नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले होते. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.


* शहर बंदची हाक :- या हत्येच्या निषेधार्थ खोपोली शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शहर प्रमुख संदीप पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे का, की निष्पाप माणसाचा जीव जातो ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


* नागरिकांमध्ये संताप :- सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीची अशी हत्या होणे ही केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण शहरावर आघात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. खोपोलीतील ही घटना अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home