शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि मंदिराकडे जाणारे रस्ते अस्वच्छतेच्या विळख्यात
नगरदेवळा गावातील पवित्र शनि महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर उघड्यावर शौच ; ग्रामस्थ व भाविकांमध्ये तीव्र संताप
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावातील शनि महाराज मंदिर हे गावासह परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर शनिवारी, शनि अमावस्या तसेच विविध धार्मिक पर्वांच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक शनि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात. मात्र, इतक्या पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते आज अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून, ही बाब गावाच्या आणि मंदिराच्या पावित्र्यावर डाग आणणारी ठरत आहे.
गावातील गणपती दरवाजापासून लक्ष्मण कुंभार यांच्या आव्या (मातीची भांडी तापविण्याची भट्टी) पर्यंतचा मार्ग, तसेच पुढे बुरूजापासून बंधाऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर उघड्यावर शौचामुळे अक्षरशः दुर्गंधीने भरलेला आहे. विशेषतः रोज रात्री आणि पहाटेच्या सुमारास या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर लोक शौचासाठी बसत असल्याने भाविकांना मंदिरात जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
इतकेच नव्हे तर पाण्याच्या टाकीकडून येणारा रस्ता आणि शिंदोळकडून येणारा मार्ग या दोन्ही रस्त्यांवरही उघड्यावर शौचाचा सडा पडलेला दिसून येतो. शेकडो लोकांचे श्रद्धास्थान आणि नगरदेवळा नगरीचे आराध्य दैवत असलेल्या शनि महाराजांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था पाहून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावात विविध ठिकाणी आकर्षक प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. मात्र, बाजारपेठेतून शनि महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर, गणपती दरवाजाशेजारी शनि महाराजांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार का उभारण्यात येत नाही ? असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. अशा प्रवेशद्वारामुळे मंदिराचा मार्ग ओळखण्यास सोपा होईलच, शिवाय त्या भागाचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेकडेही लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शनि महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता स्वच्छ झाला, तर गावाची साडेसाती संपेल. गावात पुन्हा सुख-शांती नांदेल आणि खुंटलेला विकास पुन्हा वेग घेईल, अशी भावना अनेक भाविक बोलून दाखवत आहेत. मात्र, एवढी गंभीर बाब असूनही ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागला आहे.
शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत गावोगावी स्वच्छतेचे धडे दिले जात असताना, श्रद्धास्थानाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांची अशी अवस्था लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. आता तरी संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन उघड्यावर शौच थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते स्वच्छ करावेत आणि भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता येईल यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home