ग्रीन सिग्नल : निवडणूक आयोगाचा ‘लाडक्या बहिणीं’ना मोठा दिलासा
आचारसंहिता लागू असतानाही नोव्हेंबर - डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता ; केवायसीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत
मुंबई / मानसी कांबळे :- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सुरू असून, निवडणुका तीन टप्प्यांत पार पडत आहेत. दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे मतदान पार पडले असून, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या जागांसाठी मतदान शनिवार, 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय महापालिका निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आचारसंहितेमुळे निधी वितरण रखडेल, अशी भीती होती. मात्र आता याच संदर्भात लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित करण्यास कोणताही अडसर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असून, लवकरच हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी लाडकी बहीण योजना ही आधीपासून सुरू असलेली योजना असल्याने तिच्या निधी वितरणावर आचारसंहितेचा प्रतिबंध लागू होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. योजना नवीन नसल्यामुळे तिचे नियमित हप्ते देण्यास कोणतीही अडचण नाही, असे आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, “लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महापालिका निवडणुकांच्या चार ते पाच दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही महिन्यांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, केवायसी न केल्यास सुमारे 40 ते 50 लाख लाभार्थी योजनेबाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली असून, त्या आधी महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
एकूणच, निवडणूक काळातही निधी वितरणाला मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण असून, आता प्रत्यक्ष पैसे खात्यात केव्हा जमा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home