नेरळ गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद
रायगड पोलिसांचे मोठे यश ; गावठी कट्टा, राऊंड व मोटारसायकल जप्त
नेरळ / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गुजरात व नाशिक परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
सदर गुन्हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी घडला असून, 25 नोव्हेंबर 2025 रोजी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 109, 126(2), 351(2), 3(5) तसेच भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 3 व 25 लावण्यात आले आहेत.
* पूर्ववैमनस्यातून गोळीबार :- फिर्यादी सचिन अशोक भवर (वय 40, रा. धामोते - नेरळ) हे बदलापूर येथून कामावरून स्कुटीवर घरी जात असतांना, धामोते येथील पेशवाई रोडवर आरोपींनी संगनमताने सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) वरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीला अडवून त्यांच्यावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
* आरोपींची अटक :- अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश जगन्नाथ मार्के (वय 45) सध्या रा. नेरळ, मूळ रा. खडकी, कोपरगाव (जि. अहिल्यानगर), दीपक विनायक कोळेकर (वय 40) रा. हिरावाडी, नाशिक.
विशेष म्हणजे, आरोपी अविनाश मार्के हा संगमनेर पोलिस ठाण्यातील खून प्रकरण (गु.र.नं. 72/2020) मधील फरार आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी व आर्म ऍक्ट अंतर्गत 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रमांक दोनवरही खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.
* संयुक्त पथकाची कारवाई :- हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि आरोपी फरार असल्याने, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार नेरळ व कर्जत पोलिस ठाण्याची संयुक्त तपास पथके स्थापन करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गुजरात व नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र आरोपी वारंवार वास्तव्य बदलत असल्याने तपास आव्हानात्मक ठरत होता.
अखेर तपास पथकाने नाशिक परिसरात सलग आठ दिवस तळ ठोकून पाठलाग करीत 5 डिसेंबर 2025 रोजी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे.
* हत्यारे व वाहन जप्त :- आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, जिवंत काडतूस (राऊंड), सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे (नेरळ), पो. उपनि. सुशिल काजरोळकर (नेरळ), पो. उपनि. सुशांत वरक (कर्जत) तसेच पोलिस अंमलदार स्वप्निल येरुणकर, सचिन वाघमारे, आर. बी. केकाण, आश्रुबा बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी बजावली.
या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून, पुढील तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home