Wednesday, December 10, 2025

मधु कांबीकर : लोककलेपासून राष्ट्रीय गौरवापर्यंतचा संघर्ष, साधना आणि सर्वोच्च अभिनयाचा प्रवास

 


मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, जे केवळ अभिनय करीत नाहीत तर जगलेले आयुष्यच पडद्यावर साकार करतात. मधु कांबीकर (मधु वामन जाधव) हे असेच एक बहुआयामी, संघर्षशील आणि अत्युच्च अभिनयशैलीचे नाव आहे. मधु कांबीकर ही नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री आहे, असा गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात काढला, हेच त्यांच्या प्रतिभेची पोच दाखवणारे आहे.

* बालपण आणि लोककलेची पायवाट :- 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी शिक्षणाची सुरुवात मालेगाव येथेच केली. पुढील शिक्षण कांबी या गावात झाले. अवघ्या 11 व्या वर्षी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले, तर वयाच्या 13-14 व्या वर्षी गुरू पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या सान्निध्यात लावणी नृत्याची साधना सुरू झाली. येथूनच त्यांच्या लोककलेच्या तपश्चर्येला सुरुवात झाली.

* रंगभूमीवरील पहिली ठळक ओळख :- चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना ‘पुत्रकामेष्टी’ (1980) या नाटकात संधी दिली. लोककलावंत म्हणून त्यांची अवहेलना झाली, तरी प्रभाकर पणशीकर वडीलकीच्या नात्याने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या नाटकातील अभिनयासाठी मधू कांबीकर यांना ‘नाट्यदर्पण - विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला. पुढे ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा 19 नाटकांमधून त्यांनी सशक्त भूमिका साकारल्या.

* 'शापित’ आणि अभिनयाची सिद्धी :- 1982 साली आलेला ‘शापित’ हा चित्रपट मधू कांबीकर यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला. ‘बिजली’ ही ग्रामीण, शोषित व वेठबिगार स्त्री - अक्षमतेपासून सक्षमतेपर्यंतचा तिचा प्रवास त्यांनी अस्सल वास्तवतेने उभा केला. या भूमिकेसाठी त्यांना 1983 - महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यामुळेच त्यांची अभिनयक्षमता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने मान्य केली.

* सतत आव्हानात्मक भूमिका :- 'राघू मैना’, ‘हेच माझे माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’ या चित्रपटांतून मातृत्व, संघर्ष, लोककलावंताची वेदना आणि स्त्रीजीवनाचा प्रवास त्यांनी प्रभावीपणे मांडला. ‘हेच माझे माहेर’ मधील ‘शकू’साठी त्यांना 1985 चा राज्य पुरस्कार, तर ‘रावसाहेब’ साठी 1996 चा राज्य पुरस्कार मिळाला.

* मराठीपलीकडेही अव्वल ठसा :- 1999 साली गुजराती ‘साद’ चित्रपटातील संवादरहित अभिनयासाठी त्यांना गुजरात राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला, हा त्यांच्या अभिनयाच्या जागतिक दर्जाचा पुरावा होता. 'आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘संघर्ष जीवनाचा’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांना राज्य पुरस्कार मिळाले.

* लोककलेचे संवर्धन - मधूप्रीतम :- 1996 मध्ये त्यांनी ‘मधुप्रीतम’ संस्थेची स्थापना करून ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक लावणीचे जतन, संशोधन व सादरीकरण केले. याशिवाय ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान’ स्थापन करून लोककलेप्रती आपली निष्ठा जपली.

* आजचे वास्तव - भावनिक पण प्रेरणादायी :- 2016 मध्ये रंगमंचावर असतानाच आलेल्या पक्षाघातानंतर त्यांचे आयुष्य स्थिर झाले. आज त्या बोलत वा हालचाल करीत नसल्या, तरी घरात चित्रपट सुरू झाला की त्यांच्या डोळ्यातून अश्रू किंवा चेहऱ्यावर हसू उमटते, असे त्यांच्या सुन शीतल जाधव सांगतात - हेच त्यांच्या कलेशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवते.

* मराठी सृष्टीतील अढळ स्थान :- लोकनाट्य, नाटक, दूरदर्शन, चित्रपट आदी सर्व माध्यमांत सातत्य, दर्जा आणि आत्मिक अभिनय जपत मधु कांबीकर यांनी मराठी सृष्टीत एक अढळ मानाचे स्थान निर्माण केले आहे. 2018 साली मिळालेला झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान आहे.

मधु कांबीकर म्हणजे अभिनय नाही, तो अनुभव आहे, संघर्ष आहे आणि मराठी मातीचा आवाज आहे.


संकलन - मानसी गणेश कांबळे 

(संपादक - माय कोकण न्यूज 24) 


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home