परिवर्तना'च्या स्वप्नांना हाताने झाडून काढले !
* खोपोली भगवामय, कुलदीपक शेंडे यांचा दणदणीत विजय
* नगराध्यक्षपदी 1,118 मतांनी सरशी ; शिंदे गट 14 जागांसह आघाडीवर, राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान
* शरद पवार गटाचे खाते उघडले, अपक्ष राहुल गायकवाड नगरसेवक झाले
* सुनील पाटील, मसुरकर, पानसरे, सॅम्युअल, रियाज पठाण यांना पराभवाचा झटका
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होताच शहरात राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, शिवसेना - भाजप - आरपीआय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचा 1,118 मतांनी पराभव करीत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खोपोलीत भगवामय वातावरण निर्माण झाले आहे.
या लढतीत काँग्रेसचे तौफिक कर्जिकर, आम आदमी पार्टीचे डॉं. रियाज पठाण तसेच पत्रकार किशोर साळुंके यांनी मिळून 1,602 मते घेतली. याशिवाय ऋषिकेश कोंडुसकर (273) आणि पत्रकार अनिल वाघमारे (318) यांनाही लक्षणीय मते मिळाली. या मतविभाजनामुळे मुख्य लढतीतील मतांतील अंतर वाढल्याचे चित्र दिसून आले.
* दिग्गजांना पराभवाचा धक्का :- या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉं. सुनील पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, माजी नगरसेवक किशोर पानसरे, जीनी सॅम्युअल आदी दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवार गटाचे खाते सुवर्णा मोरे यांच्या विजयामुळे उघडले, तर राहुल गायकवाड हे एकमेव अपक्ष नगरसेवक ठरले.
* प्रचारयंत्रणा आणि नेतृत्व :- महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली. बूथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद यांचा पुरेपूर वापर या विजयामागे निर्णायक ठरला. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची ही प्रतिष्ठेची निवडणूक असतानाही प्रचारातील विस्कळीतपणा व नियोजनाचा अभाव मतदारांच्या नजरेतून सुटला नाही, अशी प्रतिक्रिया शहरात उमटली.
* मतदानाचा आढावा :- खोपोली शहरात एकूण 62,074 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 42,448 मतदारांनी नगराध्यक्षपदासाठी मतदानाचा हक्क बजावला.
* विजयी उमेदवार - प्रभागनिहाय (संक्षेप) :-
प्रभाग 1 : मंगेश दळवी (राष्ट्रवादी), श्रुती पालांडे (शिवसेना-शिंदे)
प्रभाग 2 : अमित फाळे, मानसी काळोखे (दोन्ही शिवसेना शिंदे)
प्रभाग 3 : सुवर्णा मोरे (शरद पवार गट), अनिल सानप (शिवसेना शिंदे)
प्रभाग 4 : विनायक तेलवणे (राष्ट्रवादी), प्रतिक्षा रेटरेकर (भाजप)
प्रभाग 5 : हर्षदा गायकवाड, समीर मसुरकर (राष्ट्रवादी)
प्रभाग 6 : मयुरी शेलार (शिवसेना शिंदे), राहुल गायकवाड (अपक्ष)
प्रभाग 7 : ऐश्वर्या पाटील, प्रशांत शेंडे (दोन्ही राष्ट्रवादी)
प्रभाग 8 : रुपाली जाधव, रुकसाना जळगावकर (दोन्ही शिवसेना शिंदे)
प्रभाग 9 : गणेश सुतक, तसलीम पाटील (दोन्ही शेकाप)
प्रभाग 10 : अनिता पवार, उज्ज्वला महाडिक, हरीश काळे (शिवसेना शिंदे पॅनल)
प्रभाग 11 : सानिया शेख, विक्रम साबळे (दोन्ही भाजप)
प्रभाग 12 : वनिता कांबळे औटी, निजामुद्दीन जलगावकर (दोन्ही शेकाप)
प्रभाग 13 : अविनाश किर्वे, वंदना सावंत (दोन्ही शिवसेना शिंदे)
प्रभाग 14 : रेश्मा गायकवाड (शिवसेना शिंदे), किशोर पाटील (भाजप)
प्रभाग 15 : स्वेला अहिर (राष्ट्रवादी), संदीप पाटील (शिवसेना-शिंदे)
ही निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडीपुरती मर्यादित न राहता, आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची कसोटी ठरली. अखेरीस, मतदारांनी दिलेल्या कौलातून महायुतीच्या नियोजनबद्ध प्रचाराला मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले. खोपोलीत पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा हा निकाल मानला जात आहे.
* नगराध्यक्षपदाचा निकाल :-
कुलदीपक शेंडे : 20,469 मते
डॉं. सुनील पाटील : 19, 351 मते
मताधिक्य : 1,118
* पक्षनिहाय जागा :-
शिवसेना (शिंदे गट) - 14
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 7
भाजप - 4
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) - 4
शरद पवार गट - 1
अपक्ष -1


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home