सर्व आरोपींना अटक न झाल्यास पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
* उद्या कॅण्डल मार्च ; मंगेश काळोखे हत्येतील सर्व दोषींना अटक व फाशीची शिक्षा द्यावी - आमदार महेंद्र थोरवे
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अति तातडीची बैठक घेऊन आंदोलनाचा स्पष्ट इशारा दिला.
बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, साईबाबानगर ते खोपोली पोलिस स्टेशनपर्यंत मंगेशची निर्घृण हत्या झाली, त्या घटनेच्या निषेधार्थ उद्या सायंकाळी पाच वाजता कॅण्डल मार्च काढण्यात येईल. खोपोली हे सांस्कृतिक शहर असून अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. ही लढाई कायदेशीर मार्गांने लढायची असून मंगेशच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
थोरवे यांनी आरोप केला की, आतापर्यंत अटक न झालेल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. मात्र राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असून आरोपींना अटक करू नये, निर्दोष ठरवून बाहेर काढावे असा प्रयत्न सुरू आहे. अशा दबावाला बळी न पडता पोलिसांनी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
काल एकनाथ शिंदे खोपोलीत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी जाहीरपणे, या प्रकरणातील जे-जे आरोपी सहभागी आहेत, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन दिल्याचे थोरवे यांनी नमूद केले.
आमदार थोरवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सर्व आरोपी उद्यापर्यंत अटक झाले पाहिजेत. अन्यथा परवापासून आम्ही सर्वजण खोपोली पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करू. जोपर्यंत मंगेश काळोखे हत्येतील सर्व आरोपींना अटक होत नाही आणि जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
या घोषणेमुळे खोपोली शहरात तणावाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले असून, उद्याच्या कॅण्डल मार्चला मोठ्या सहभागाची शक्यता वर्तवली जात आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home