खोपोली हादरविणाऱ्या खूनाच्या घटनेनंतर पोलिसांची वेगवान कारवाई ; तपासासाठी आठ पथके कार्यरत
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात काल सकाळी घडलेल्या धक्कादायक आणि भिषण घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
* नागोठणेतून दोन संशयित ताब्यात :- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर या दोन संशयितांना नागोठणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील कट, शस्त्र पुरवठा आणि इतर सहकाऱ्यांची भूमिका उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
* आठ पोलिस पथके तपासात :- या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. खोपोली, नवी मुंबई, मुंबई, मुंबई विमानतळ परिसर तसेच रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ही पथके तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने आणि आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
* दहा जणांविरोधात गुन्हा दाखल :- या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा ज्ञात आणि चार अज्ञात आरोपींचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.
* राजकीय वैमनस्याचा प्राथमिक संशय :- मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना (शिंदे गट) कडून निवडून आल्या असून त्या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या सर्व बाबी तपासाअंती स्पष्ट होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
* कठोर शिक्षेची मागणी :- या हत्येमुळे खोपोली शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
* पोलिसांचा निर्धार :- पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले की, या प्रकरणात तपासासाठी आठ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाईल. खोपोली शहराला हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील सर्व दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा देण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home