खोपोलीचा कौल कुणाला ?
शिवसेना-भाजप युती आघाडीवर की राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला?
* सत्तासंघर्षाच्या रणांगणात खोपोली ; 70 तासांत राजकीय चित्र स्पष्ट होणार!
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीने केवळ शहरापुरतेच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान झाले आणि त्या दिवसापासून उमेदवार, नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदार सर्वजण एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत...खोपोलीचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार ?
नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 7 उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत ही शिवसेना-भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशीच रंगताना दिसत आहे.
* शेंडे फॉर्म्युला विरुद्ध राष्ट्रवादीची गोंधळलेली रणनीती :- युतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शेंडे यांची उमेदवारी ‘फिक्स’ असल्याची खात्री कार्यकर्त्यांमध्ये होती आणि त्याच आत्मविश्वासातून बुथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद दिसून आली.
याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची ही प्रतिष्ठेची निवडणूक असूनही, प्रचारातील विस्कळीतपणा आणि नियोजनाचा अभाव शहरवासीयांच्या नजरेतून सुटलेला नाही. लोकप्रियतेत आघाडीवर असलेले माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील प्रचारयंत्रणेत मात्र मागे पडले, अशी स्पष्ट प्रतिक्रिया मतदारांकडून ऐकू येते.
आजच्या घडीला जनमताचा सूर पाहता नगराध्यक्षपदावर कुलदीपक शेंडे यांची सरशी संभवते, असे संकेत ठळकपणे मिळत आहेत.
* प्रभागांमध्ये ‘पैसा, प्रतिष्ठा आणि प्रभाव’ यांची लढाई :- खोपोलीतील अनेक प्रभागांत निवडणूक म्हणजे विकास नव्हे, तर प्रतिष्ठा, वर्चस्व आणि ‘अर्थ’शक्तीचा संघर्ष ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्र. 10 हा शीळफाटा परिसरातील सर्वात मोठा प्रभाग चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. साध्या नगरसेवक पदासाठी पाऊण कोटी ते एक कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. येथे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील आणि शिवसेनेचे हरीश काळे यांचे प्रभावक्षेत्र असल्याने, ‘आप’च्या मतांचा कल कुणाच्या बाजूने जातो यावर निकाल अवलंबून आहे.
प्रभाग 3 मध्ये प्रकाश गायकवाड व रेखा जाधव यांच्या मतांवर किशोर पानसरे विरुद्ध अनिल सानप यांची लढत ठरते. प्रभाग 6 मध्ये भाजपचे संजय तन्ना आणि अपक्ष राहुल गायकवाड यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग 5 मध्ये भाजपचे इंदरमल खंडेलवाल आणि राष्ट्रवादीचे समीर मसूरकर यांची थेट लढत रंगतदार ठरली आहे. महिला जागेवरही सोनिया रुपवते (शिवसेना) विरुद्ध हर्षदा गायकवाड (राष्ट्रवादी) यांची प्रतिष्ठेची झुंज आहे.
प्रभाग 7 मध्ये जाधव - शेंडे - पाटील असा त्रिकोणी संघर्ष आहे तर प्रभाग 11 मध्ये भाजपचे विक्रम साबळे यांचा आत्मविश्वास विरुद्ध शेकापची आशा असे चित्र दिसून येत आहे. प्रभाग 12 मध्ये रॉबीन सॅम्युअल विरुद्ध निजाम जलगावकर यांचा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग 14 मध्ये माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर विरुद्ध भाजपचे किशोर पाटील ही लढत मसूरकरांच्या राजकीय वजनाची कसोटी मानली जात आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अत्यंत गंभीर संघर्ष दिसून येत असून काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* राजकीय नेतृत्वाची खरी परीक्षा :- ही निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडण्यापुरती मर्यादित नाही. ती आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची परीक्षा...ऐनवेळी राष्ट्रवादीकडून डॉं. सुनील पाटील यांना उमेदवारी देणे योग्य ठरले का ? दत्ता मसूरकर यांची राजकीय जादू अजूनही कायम आहे का ? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का ? आम आदमी पार्टी कुणाचे गणित बिघडविणार ? याची उत्तरे शोधणारी... दरम्यान, 21 डिसेंबर, रविवार रोजी मतमोजणीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
* शेवटचे 70 तास…आणि खोपोलीचा अंतिम फैसला :- शिवसेना - भाजप युतीला 31 पैकी 23 ते 24 जागा मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. पण निवडणूक म्हणजे शेवटच्या मतापर्यंत अनिश्चितता. खोपोलीकरांनी आपला कौल दिला आहे. आता प्रश्न एकच आहे खोपोलीची सत्ता कोणाच्या हाती ? आणि याचे उत्तर अवघ्या काही तासांत खोपोलीकरांना मिळणार आहे.
.png)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home