Wednesday, December 17, 2025

खालापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना मुंबईतून अटक

* मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील ट्रकमधील चोरी उघड

* मुंबईतील डोंगरी परिसरातून मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात

खालापूर / प्रतिनिधी :- मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर घडलेल्या चोरीच्या घटनेचा यशस्वी छडा लावत खालापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतील डोंगरी परिसरातून आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, या यशाबद्दल खालापूर पोलिसांचे जिल्हा स्तरावर कौतुक होत आहे.


ही कारवाई रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल मेहुल (खालापूर) तसेच पोलिस निरीक्षक सचिन पवार (खालापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जगताप, खालापूर पोलिस व मुंबई पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.


* नेमकी घटना काय होती ? :- 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील माडप बोगद्याजवळ फिर्यादी आपल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH 16 AY 6197) मधून प्रवास करीत असताना, माडप टनेल ते कुंभिवली ब्रिज दरम्यान एका अज्ञात इसमाने चालत्या ट्रकमध्ये चढून चोरी केल्याची घटना घडली. आरोपींनी ट्रकमधील अल्युमिनियम अलॉय इंगोट्स या मालातील 45 नग (एकूण किंमत सुमारे 32,400 रुपये) खाली रस्त्यावर टाकले आणि मागील वाहनाने ते उचलून नेले.


* सीसीटीव्हीच्या आधारे तपास :- घटनेनंतर खालापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे गुन्ह्याचे धागेदोरे मुंबईतील डोंगरी - वाडीबंदर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पो. उपनि. अशोक जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखेने बातमीदारांच्या मदतीने सापळा रचला.


* आरोपी अटक, गुन्ह्याची कबुली :- या कारवाईत अर्जुन शंकर काळे (वय 32, रा. वाडीबंदर, डोंगरी, मुंबई) आणि सोहेल रहीम खान (वय 40, रा. वाडीबंदर, ब्रीजखाली, डोंगरी, मुंबई) हे दोघे चारनळ चौक, डोंगरी येथे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मिळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे संतोष रतन काळे (रा. वाडीबंदर, डोंगरी) आणि ‘उम्मी’ (पूर्ण नाव माहित नाही) अशी सांगितली. मात्र, चोरीचा उर्वरित माल व फरार आरोपींबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने 11 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.


* मुद्देमाल जप्त, पोलिस कोठडी :- आरोपींना न्यायालयात हजर केले असता 16 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली. पोलिस कोठडीदरम्यान चोरीचा माल घासबंदर, माजगाव (मुंबई) येथील भंगार दुकान मालक मोहम्मद मुजफ्फर कलील मिस्री याच्याकडून तसेच गुन्ह्यात वापरलेली इको कार (क्रमांक MH 01 AT 2040) जप्त करण्यात आली आहे.

* दोन आरोपी फरार :- सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन फरार आरोपींचा शोध खालापूर पोलिस घेत आहेत. ही कारवाई मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणारी ठरली असून, खालापूर पोलिसांच्या तत्परता व कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home