अलिबाग जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहात साजरा
कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती
रायगड / प्रतिनिधी :- मा. मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग आणि अलिबाग जिल्हा कारागृह (वर्ग 2) यांच्या संयुक्त समन्वयाने 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन अलिबाग जिल्हा कारागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण, मूलभूत अधिकार आणि त्यासंबंधीची जनजागृती करण्यात आली.
* बंद्यांच्या हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन :- कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ ॲंड. मानसी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, दरवर्षी 10 डिसेंबर रोजी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश बंद्यांचे मूलभूत अधिकार जपणे आणि त्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आहे. यावेळी त्यांनी बंद्यांना समान प्रतिष्ठा, न्याय्य वागणूक तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे व कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तक्रार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
* समानतेचा व मानवतेचा संदेश :- यावेळी ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग, श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी मानवाधिकारांचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. तुरुंगातील दैनंदिन अडचणींवर मात कशी करावी, बंद्यांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी, तसेच समता व मानवतेच्या आधारे मिळणाऱ्या वागणुकीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
* पुरुष व महिला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- या कार्यक्रमास 173 पुरुष व महिला बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अशा उपक्रमांमुळे कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
* उच्चस्तरीय मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन :- हा कार्यक्रम अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, वारके (भा.पो.से.) तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह (दक्षिण विभाग), भायखळा, योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली.
कार्यक्रमास अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, विशाल बांदल, ॲंड. ए. डी. पाटील (उपाध्यक्ष), ॲंड. अमित देशमुख (सचिव), ॲंड. राजेंद्र माळी (खजिनदार) वकील बार असोसिएशन अलिबाग, ॲंड. शेखर कामथे (मुख्य लोक अभिरक्षक), ॲंड. निलोफर शेख, ॲंड. तन्मय म्हात्रे (सहाय्यक लोक अभिरक्षक), श्रीमती नितल म्हात्रे (लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), ॲंड. विकास पाटील, ॲंड. हिना तांडेल, ॲंड. आदित्य कांबळे, ॲंड. पुनम राजंळकर (विधी स्वयंसेवक) तसेच कारागृह अधिकारी किशोर वारगे (तु.अ. श्रेणी 2), कुटे (सुभेदार), वाणी, वाघमारे (शिपाई) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home