खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : मतमोजणीपूर्व सुरक्षा तयारीचा आढावा
मुख्याधिकारी पंकज पाटील यांची स्ट्रॉंग रूमला भेट ; 24 तास CCTV, अग्निशमन व कडक सुरक्षा व्यवस्थेची खात्री
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्व सुरक्षा व्यवस्था, पारदर्शकता व विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी नुकतीच मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात असल्याची त्यांनी खात्री करून घेतली.
या भेटीदरम्यान पाटील यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख सुरू असल्याची तपासणी केली. संपूर्ण परिसरातील हालचालींवर थेट नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत व कार्यरत असल्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ सुरू होणाऱ्या पॉवर बॅकअप (बॅटरी) व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था अथवा अन्य सुरक्षायंत्रणा बंद पडू नये, यासाठी संपूर्ण बॅकअप प्रणाली सज्ज असल्याची खात्री करण्यात आली.
अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने फायर फायटिंग प्रणाली पूर्णतः कार्यरत असून, फायर फायटर पथक 24 तास तैनात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच एबीसी (ABC) अग्निशमन सिलिंडरची पुरेशी उपलब्धता, तसेच अग्निशमन सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी पाळीपद्धतीने 24 तास तैनात असल्याचीही तपासणी पाटील यांनी केली. स्ट्रॉंग रूम परिसरात अधिकृत स्वाक्षरी नोंदणी, कडक प्रवेश तपासणी व प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू असल्याचे आढळून आले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना 24 तासांत कोणत्याही वेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मतमोजणीपूर्व संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, खोपोली येथे पार पडणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय व सुरक्षाविषयक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, पोलिस विभाग, निवडणूक शाखा व सुरक्षा यंत्रणा पूर्ण समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत, नियोजनबद्ध आणि पूर्णतः निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home