भिवपुरी - कारशेट मार्गावरील भरावकाम व उत्खननाबाबत संशयाचे ढग
सावरगाव येथील कामाची माहिती मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे RTI अर्ज दाखल
कर्जत / प्रतिनिधी :- भिवपुरी - कारशेट मार्गांच्या कामासाठी सावरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या भरावकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भरावकामासाठी वापरण्यात आलेल्या मुरूम, माती व खडीचे उत्खनन नेमके कुठून करण्यात आले, त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या होत्या का ? तसेच प्रत्यक्षात किती प्रमाणात उत्खनन व भराव करण्यात आला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव (रा. फुलाची वाडी, किरवली, ता. कर्जत) यांनी तहसीलदार कार्यालय, कर्जत येथे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज दाखल करून सविस्तर माहितीची मागणी केली आहे.
* शासकीय नोंदीप्रमाणे काम झाले का ? :- हे भरावकाम शासकीय नियम व नोंदींनुसार झाले आहे की नाही, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. सार्वजनिक निधी तसेच नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असताना पारदर्शकता राखणे अत्यावश्यक असून, या कामाशी संबंधित सर्व माहिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
* सार्वजनिक निधी व नैसर्गिक संसाधनांचा प्रश्न :- या मार्गांच्या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे नैसर्गिक संपत्तीशी संबंधित असल्याने उत्खनन परवानग्या, रॉयल्टी भरणा आणि प्रत्यक्ष कामाचा हिशोब योग्य पद्धतीने झाला आहे का, याची खातरजमा होणे गरजेचे आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर काम नियमबाह्य झाले असेल तर शासनाचे आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* तहसीलदार कार्यालयाकडून कारवाईची अपेक्षा :- RTI अर्जाच्या आधारे तहसीलदार कार्यालयाने आवश्यक कारवाई करून ठरलेल्या कालावधीत मागितलेली माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे. या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे की, सावरगाव येथील भरावकाम पारदर्शक होते की नियमबाह्य ? RTI मधून खरी माहिती समोर येणार का?


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home