Saturday, December 27, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली काळोखे कुटुंबीयांची भेट

 


मंगेश काळोखे हत्या प्रकरण : खोपोली प्रकरणाचे राज्यभर पडसाद


* दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खोपोली येथे मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


या भेटीदरम्यान कुटुंबीयांसह परिसरातील महिला व ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.


* ही हत्या माणुसकीला काळिमा फासणारी - एकनाथ शिंदे :- यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंगेश काळोखे यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही हत्या पूर्णतः नियोजनबद्ध असून यामागे कट रचण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सक्षम सरकारी वकील नेमण्यात येईल. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देणे हीच काळाची गरज आहे.


* लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती :- या भेटीच्या वेळी कर्जत - खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, नगरसेवक अमित फाळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शहराध्यक्ष संदीप पाटील, दिनेश थोरवे, अनिल मिंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, हजारो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी भूमिका यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home