नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लांबणीवर ; इच्छुकांचा जीव टांगणीला
राज्यात झेडपी - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात
* पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांचा समावेश, नगरदेवळा बाहेर
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी राजकीय धूम पाहायला मिळत होती. इच्छुक उमेदवारांची लांबलचक रांग, पक्षांतर्गत हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरू असतानाच आता ही निवडणूक लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समितीचा समावेश नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली होती. शिवसेना (शिंदे गट) कडून नगरदेवळा जिल्हा परिषद गटासाठी रावसाहेब जिभू ऊर्फ मनोहर गिरधर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बाळद पंचायत समिती गणासाठी शीतल सोमवंशी यांचे नाव देखील फायनल करण्यात आले आहे. तर नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अभिलाषा रोकडे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपकडूनही तिकीटासाठी अनेक इच्छुक रिंगणात असून मुन्ना (प्रणय) भांडारकर, रविंद्र पुंडलिक पाटील ऊर्फ रवी बाबा, प्राचार्य किरण काटकर, विलास भामरे, नामदेव भावडू पाटील, सागर पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून रोशन जाधव, सोनू परदेशी, नामदेव विश्राम महाजन हे इच्छुक असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआयचे विविध गट, एमआयएम यांसारखे लहान-मोठे पक्ष तसेच काही अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
* राज्यात झेडपी - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात :- राज्यातील 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि तीन जिल्हा परिषदांतील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याने एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार असून, उर्वरित निवडणुका न्यायालयाच्या निर्णयानंतरच होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच अहिल्यानगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील 88 पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने तेथेही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
* पहिल्या टप्प्यात ‘या’ 12 जिल्हा परिषदांची निवडणूक :- पहिल्या टप्प्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांतील तसेच त्या जिल्ह्यातील 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील निवडणुका सर्वोच्च न्यायालय यांच्या पुढील आदेशानंतरच घेण्यात येणार आहेत.
* 5 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता :- राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 5 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाण्याची शक्यता आहे. एकूण 21 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, संभाव्य निवडणूक कालावधी 5 ते 27 जानेवारी असा असू शकतो.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे की, आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदांमधील निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीतच पार पडतील, तर उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका पुढील आदेशानुसार घेतल्या जातील.
एकूणच, नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता असली तरी, आधीच तयारीला लागलेल्या उमेदवारांना आपले काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. आता सर्वांचे लक्ष पहिल्या टप्प्यातील निवडणुका आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home