पोलिस यंत्रणा व सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय सहकार्य
रायगड / प्रतिनिधी :- समाजातील दुर्लक्षित, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना आधार देणाऱ्या कार्यातून नागरी सामाजिक विकास संस्थेने माणुसकीचे दर्शन घडविणारे एक अत्यंत स्तुत्य सामाजिक कार्य आज यशस्वीरीत्या पार पाडले. खोपोली परिसरातून माणगाव तालुक्यातील विळेगाव भागात भटकत असलेल्या एका निराधार मानसिक रुग्णाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्याला योग्य निवाऱ्यात दाखल करण्यात आले.
ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम मनचक्षू फाउंडेशनच्या टीमसोबत संयुक्तपणे राबविण्यात आली असून, या कार्यासाठी पोलिस प्रशासनाचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
* पोलिस प्रशासनाचे तत्पर सहकार्य ठरले निर्णायक :- या रेस्क्यू मोहिमेसाठी मानगाव पोलिस ठाणे आणि खोपोली पोलिस स्टेशन यांनी तत्काळ प्रतिसाद देत आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले. विशेषतः खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिलेले मार्गदर्शन, समन्वय आणि सक्रिय सहभाग संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्यंत निर्णायक ठरले.
तसेच मानगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद तांदळे आणि यशोधन गालींदे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
* स्थानिक नागरिकांची सामाजिक बांधिलकी ठरली प्रेरणादायी :- या संपूर्ण मोहिमेत स्थानिक नागरिक नरेंद्र मामुनकर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि वेळेवर दिलेले सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या मदतीमुळे रेस्क्यू कार्य अधिक सुलभ, सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पार पडले.
* निराधारांना सन्मानाचे जीवन देण्याचा संस्थेचा ध्यास :- नागरी सामाजिक विकास संस्था ही समाजातील निराधार, दुर्लक्षित तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. अशा व्यक्तींना सुरक्षित निवारा, आवश्यक वैद्यकीय उपचार आणि सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
* संस्थापिका वर्षा मोरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती :- या सामाजिक उपक्रमासाठी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका वर्षा राजेश मोरे स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण रेस्क्यू प्रक्रियेवर लक्ष ठेवत होत्या. त्यांच्या तत्पर नेतृत्वामुळे आणि समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यावेळी बोलताना त्यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमांत सहभागी होऊन माणुसकीचा हात पुढे करावा, असे आवाहन ही केले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home