ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार ; आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा संदेश
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील 80 ते 90 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मिलिंद सोनवणे सर, अनिल काटकर सर, संपत वानखेडे सर, राजपूत सर, परदेशी सर, मुख्याध्यापक गणेश खैरनार सर, योगेश पाटील, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पाळी स्वच्छतेबाबत उघडपणे चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
* पाळी स्वच्छता व आरोग्याबाबत सखोल जनजागृती :- यावेळी विद्यार्थिनींना पाळी (Periods) काळातील स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाळीच्या काळात जुना, अस्वच्छ कपडा वापरल्याने होणारे धोके स्पष्ट करण्यात आले. यामध्ये योनी संसर्ग, पांढरपेशा, पेल्विक इन्फ्लेमेशन (PID), त्वचारोग, दुर्गंधी, मूत्रसंस्थेचे आजार तसेच वंध्यत्वाचा धोका यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तसेच सॅनिटरी पॅड वापरण्याचे फायदे, योग्य पॅडची निवड, पॅड 4 ते 6 तासांनी बदलण्याचे महत्त्व, आहार, मानसिक आरोग्य व शारीरिक काळजी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. “पाळी ही लाजिरवाणी नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे,” हा संदेश विद्यार्थिनींना देत आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.
* नगरदेवळा परिसरासाठी व्यापक आरोग्य संकल्प :- याप्रसंगी बोलताना अभिलाषा भिला रोकडे यांनी महिला व तरुणींच्या आरोग्य व सन्मानासाठी आपली ठाम भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, महिला व तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, सन्मान व आरोग्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा व परिसरातील सर्व गावांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये कॉईन पॅड व्हेंडिंग मशीन बसविणे, सॅनिटरी पॅड वितरण मोहीम, पिरीयड स्वच्छता जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, पॅड डिस्पोज मशीन, गुड टच - बॅड टच जनजागृती शिबिरे आदी उपक्रम राबविण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला.
हे उपक्रम नगरदेवळा, संगमेश्वर, चुंचाळे, पिंपळगाव, बदरखे, निपाणे, मोहलाई, नगरदेवळा सिम, आखतवाडे, नेरी तसेच नगरदेवळा पंचायत समिती गण व नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* स्वच्छता हीच सुरक्षितता - सुरक्षितता हीच सक्षमता :- पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता वाढल्यास मुलींचा आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारते आणि समाज अधिक सक्षम होतो, असा ठाम विश्वास व्यक्त करीत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनी केले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home