खोपोलीजवळ भीषण अपघात
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाच्या कॉलमला ट्रकची जोरदार धडक ; चालकाचा जागीच मृत्यू
खोपोली / खलील सुर्वे :- मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर बुधवार, 17 डिसेंबर रोजी पहाटे सुमारे 4.35 वाजता एक भीषण अपघात झाला. सी. फॉर. एक्स (C-for-X) ब्लॉकने भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट अमृतांजन पुलाच्या कॉलमला जोरदार धडकला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MH 12 LT 9777 उतारावर येत असताना अचानक ब्रेक फेल झाले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रक थेट अमृतांजन ब्रिजच्या कॉलमवर आदळला. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या अपघातात धनंजय दत्तात्रेय घुंडरे (वय 36, रा. देवाची आळंदी) या ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ट्रकमध्ये अडकलेला व छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे उतारावरील जड वाहनांच्या ब्रेक तपासणी व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home