Saturday, November 15, 2025

अर्जांच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय समीकरणे तापली

 


खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 

* शिंदे गट - राष्ट्रवादी (अजित गट) आमनेसामने

* शेंडे - पाटील यांच्यात अटीतटीची थेट लढत

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे आता शेवटचे दिवस सुरू असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाची निवडणूक शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घेतले असून त्यांच्या महायुतीत प्रबळ हालचाली दिसत आहेत. दुसरीकडे सुधाकर घारे व खासदार सुनील तटकरे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबतच शेतकरी कामगार पक्षाशी हातमिळवणी करून विरोधी मोर्चा सज्ज केला आहे.


* शिवसेनेचा सुरुवातीलाच उमेदवार निश्चित :- नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाने कुलदिपक शेंडे यांचे नाव घोषित केले होते. त्यामुळे शेंडेंना प्रचारासाठी पुरेसा वेळ लाभला. आमदार महेंद्र थोरवे यांनी लवकरात लवकर पक्षांतर्गत मतभेद दूर करीत उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. प्रचार प्रमुख निश्चित झाले असून कार्यकर्ते घराघरांत पोहोचू लागल्याने शिवसेनेचा प्रचार वेगात सुरु असल्याचे चित्र आहे.


* राष्ट्रवादीचे उमेदवार मध्यरात्री जाहीर :- राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचे नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर केले. या अचानक निर्णयामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर तसेच माजी नगरसेवक मंगेश दळवी नाराज झाल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत. अलीकडेच घडलेल्या पक्षप्रवेश, बैठका आणि अंतर्गत समन्वय यामध्ये काही प्रमाणात दिरंगाई झाल्याचेही बोलले जात आहे.


* घारे–तटकरे यांची ताकद टिकून :- डॉं. सुनील पाटील हे खोपोलीतील लोकप्रिय चेहरा असून त्यांचा पाठीराख्यांचा मोठा वर्ग शहरात आहे. शिवाय सुधाकर घारे आणि खासदार सुनील तटकरे यांनी एकत्र येऊन मजबूत संघटना उभी केल्याने पाटील यांच्या बाजूनेही मोठी ताकद तयार झाली आहे. गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत घारे यांना शहरात पराभव पत्करावा लागला होता, मात्र यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी भरघोस मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


* शेंडे विरुद्ध पाटील : थेट आणि प्रखर लढत निश्चित :- अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दोन दिवसांत दोन्ही आघाड्यांचे नेते व कार्यकर्ते जोरदार हालचाली करत आहेत. एकीकडे शिंदे गट - भाजपा अर्थात महेंद्र थोरवे - प्रशांत ठाकूर - शेंडे यांच्या एकजुटीचा फायदा होऊ शकतो, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा मजबूत स्थानिक पाया आणि तटकरे - घारे यांचे गणितही प्रभावी ठरणार हे निश्चित.


खोपोली नगर परिषदेची निवडणूक यंदा केवळ शहरापुरती नसून संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांचा केंद्रबिंदू ठरणार असल्याने ही लढत अटीतटीची होणार यात तिळमात्र शंका नाही.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home