Thursday, November 13, 2025

खोपोली नगर परिषद बॅनर व रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती

खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार जनजागृतीला वेग आला असून विविध मार्गावर आकर्षक बॅनर्स तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळ्यांमधून जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात येत आहे. लक्ष्मीनगर, शास्त्रीनगर आदी प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर "उठा उठा, निवडणूक आली मतदानाची वेळ आली", "मतदान करा लोकशाही मजबूत करा" असे घोषवाक्ये ठळकपणे झळकत असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.


त्याचबरोबर स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीवर आधारित रंगीत व आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. "तुमचे मत -तुमचा अधिकार", "Vote for Better Tomorrow" असे संदेश असलेल्या रांगोळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्येही लोकशाही प्रक्रियेबद्दल सजगता वाढत आहे. या उपक्रमात शिक्षक व शाळा प्रशासनानेही सक्रिय सहभाग घेतला.


खोपोली नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानात आपला मौल्यवान मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागनोंदवावा. शहरातील या जनजागृती उपक्रमांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home