चौक येथे शिवस्मारकाचे भूमिपूजन
अनेक वर्षांपूर्वीची मागणी, शिवभक्त यांच्यात उत्साह
चौक/ अर्जुन कदम :- चौक या ऐतिहासिक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज ऐतिहासिक दगडी शाळेच्या आवारात संपन्न झाले, या ऐतिहासिक गावात अनेक वर्षांची जनतेची मागणी पूर्णत्वास जात असल्याने शिवभक्त आणि शिवप्रेमी यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने उंबरखिंडची लढाई ही २ फेब्रुवारी १६६१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल जनरल कारतलब खान यांच्यात झाली होती. या लढाईत शिवाजी महाराजांनी सुमारे १००० मावळ्यांच्या साथीने २०,००० मुघल सैन्याचा पराभव केला, जे गनिमी काव्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या लढाईचे नेतृत्व सरनोबत नेताजी पालकर यांनी केले होते. सर नोबत नेताजी पालकर यांचे चौक हे जन्म गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे हे एक अद्वितीय आणि महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जाते, ज्यामुळे मराठा इतिहासात या लढाईला खास स्थान आहे. आणि अशा महान योद्ध्याचे स्मारक चौक येथे नसावे याची खंत चौकवाशी यांना अनेक वर्ष होती. भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे आणि रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी स्वखर्चाने हे स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याचे भूमिपूजन चौक सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवस्मारक हे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ चौकमध्ये बाजारपेठ येथे उभारले जाणारे एक भव्य स्मारक आहे. हे स्मारक चौक च्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक होईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण ठेवणे आणि त्यांना आदरांजली वाहणे हा या स्मारकाचा मुख्य उद्देश आहे,असे रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी सांगितले. हे स्मारक महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे प्रतीक म्हणून या परिसराला प्रेरणा देईल, तरुणांमध्ये ऊर्जेची भावना निर्माण करेल असे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्यास लोकनेते जगदीश हातमोडे, चौक उपसरपंच पूजा हातमोडे, जेष्ठ नेते विनोद भोईर, गिरीश जोशी, सुभाष पवार,सौ.नयना झिंगे, वृषाली पोळेकर,राजन गावडे, प्रदीप गोंधळी, गुड्या देशमुख, सागर ओसवाल, ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे, सचिन साखरे,अजिंक्य देशमुख, शरद पिंगळे, वसंत देशमुख, चौक चे व्यापारी, चौक चे ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home