Thursday, November 13, 2025

खोपोली नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांचा सखोल आढावा

 


* लोकशाहीवरील विश्वास अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी - प्रत्येक मतदाराला निर्भय मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सर्व यंत्रणा दक्ष राहतील - जिल्हाधिकारी किशन जावळे


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १२ नोव्हेंबर रोजी खोपोली नगर परिषदेची पाहणी करून निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र यांची पाहणी केली. मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूममध्ये २४ तास सीसीटीव्ही नियंत्रण, पोलिस सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, पर्यायी वीजपुरवठा व्यवस्था आणि कडक प्रवेश नियंत्रण या सुरक्षेच्या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली.

यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्र पाहून तेथील टेबल नियोजन, कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा उपाययोजना आणि माध्यम प्रतिनिधींसाठीच्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन दिले.

जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक मतदाराला सुरक्षित आणि निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज राहतील.

या भेटीदरम्यान रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होत्या. त्यांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला आणि पोलिस तैनाती व शिस्तीबाबत सूचना दिल्या.


या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कर्जत) प्रकाश संकपाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार (खालापूर) अभय चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी (खोपोली नगर परिषद) पंकज पाटील, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.


जिल्हाधिकारी जावळे यांच्या या पाहणीमुळे निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, खोपोलीतील नगर परिषद निवडणूक सुरक्षित आणि पारदर्शक रितीने पार पडेल, असा विश्वास नागरिक आणि अधिकारी वर्गांतून व्यक्त केला जात आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home