खोपोली वॉर्ड १० : सुशांत जाधवांच्या उमेदवारीने राजकीय तापमान वाढले
*सामाजिक कार्यासोबतच पत्रकार शिवाजी जाधव यांच्या लढाऊ भूमिकेचा प्रभाव; नागरिकांचा वाढता विश्वास*
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरुण समाजसेवक सुशांत शिवाजी जाधव यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे. सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची छबी आणि नागरिकांमध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.
सुशांत जाधव यांच्या मागे त्यांचे वडील—खोपोलीतील ज्येष्ठ पत्रकार शिवाजी जाधव —यांचे मोलाचे मार्गदर्शन हे मोठे बलस्थान मानले जात आहे. शिवाजी जाधव यांनी या प्रभागातील रस्ते, वीज, गटारे, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्नांवर अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवला आहे. वेळोवेळी तक्रारी अर्ज करणे, प्रशासनाला पावले उचलण्यासाठी भाग पाडणे, तर काही प्रसंगी आंदोलन आणि उपोषण करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लढाऊ भूमिका घेतली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. या वॉर्डातील अनेक नागरिक “सुशांतभाऊंनाच मत देणार, कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने खरोखर काम केले आहे,” अशा खुल्या प्रतिक्रिया देत आहेत. स्वच्छता, पाणी, रस्ते, तसेच सर्वसामान्यांच्या तातडीच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सुशांत जाधव यांची ‘जनतेचा माणूस’ म्हणून ओळख पक्की झाली आहे.
सुशांत जाधव यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड क्रमांक १० मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home