Saturday, October 18, 2025

शासनाच्या दोन विभागांतील वादावर तहसीलदार अभय चव्हाण यांची मध्यस्थी

 


 वयाळ - लोधीवली रस्ता प्रकरणात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने तात्पुरता तोडगा; ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

खालापूर / प्रतिनिधी :- वयाळ ते लोधीवली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात चालू असलेला वाद अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने तात्पुरता निवळला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मार्ग शोधण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी त्यांच्या दालनात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात स्थळ पाहणी व काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून लोधीवली-वयाळ रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता उद्ध्वस्त झाला असून, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आहे. दोन विभागांच्या वादात ग्रामस्थ मात्र पिचले गेले आहेत.

पालकांना शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडावे लागते, तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते. याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांना भेट देत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती.

तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की, नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे. त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती खालापूर, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पंपटवार, ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रोशन गायकवाड, विनोद भोईर, प्रमोद पवार, अनिल पवार, अर्जुन पवार, समीर म्हात्रे, रुपेश पवार, अक्षय म्हात्रे, नितीन ठाकूर, भूषण म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home