जेष्ठ शिक्षक जाकीर अली सय्यद यांची ‘लाल बहाद्दूर शास्त्री’ व ‘सरोजिनी नायडू’ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
नगरदेवळा येथे एस. के. पवार शाळेतर्फे सत्कार सोहळा पार
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे जेष्ठ शिक्षक जाकीर अली सय्यद सर यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिलशाह फारूकी संस्थेच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” तसेच “श्रीमती सरोजिनी नायडू शिक्षण गौरव पुरस्कार” यासाठी सय्यद सरांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय निवडीचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज 8 नोव्हेंबर (शनिवार) रोजी नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयात सय्यद सरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सय्यद सरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जाकीर अली सय्यद हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर यश संपादन केले आहे.
आदिलशाह फारूकी संस्था राज्यभरातील शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करते. या पुरस्कारासाठी निवड होणे हे पाचोरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून नगरदेवळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सय्यद सरांच्या निवडीबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लवकरच हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असून, नगरदेवळा व पाचोरा तालुक्याचे नाव या सन्मानामुळे राज्यभर झळकणार आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home