घरपट्टी वाढीविरोधात नागरिकांचा तुफान उद्रेक
* तांत्रिक चुकांच्या नावाखाली 11 - 12 पट करवाढ
* नागरिकांचा जाब विचारण्यासाठी धडाकेबाज मोर्चा
खालापूर / सुधीर माने :- खालापूर नगरपंचायतीत घरपट्टी वाढीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तांत्रिक प्रक्रियेचे उल्लंघन करीत तब्बल 11 ते 12 पट करवाढ करून नागरिकांच्या माथी अन्याय लादण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी नगरपंचायत कार्यालयावर जल्लोषात धडक दिली.
नागरिकांच्या निदर्शनादरम्यान सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला की, जेव्हा जनता प्रश्न विचारायला आली तेव्हा लोकप्रतिनिधी पळून कुठे गेले ? उपनगराध्यक्ष, गटनेता व 15-16 नगरसेवक अनुपस्थित का होते ? जनतेच्या आक्रोशासमोर फक्त मुख्याधिकारी कोमल कराळे, नगराध्यक्षा रोशना मोडवे आणि काही नगरसेविका उपस्थित होत्या. मात्र निर्णयक्षम पदावर असलेले बहुतेक नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांनी जनतेपासून पळ काढल्याची चर्चा जनसमुदायात सर्रास होती.
* काय आहे प्रकरण ? :- 2015 मध्ये स्थापन झालेल्या खालापूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये विकासकामे रखडली आहेत. नगरपंचायतीकडे कोट्यवधी निधी असूनही काम शून्य असल्याचे दिसून येत आहे. तसेच अचानक घरपट्टीत 11 - 12 पट वाढ करण्यात आली आहे. नागरिकांना हरकत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते पण अर्ज स्विकारले गेले नाहीत, असा नागरीकांचा आरोप आहे. कोणत्या घराला कोणता कर ? गोंधळाचा कळस - खालापूर रहिवाशांना वनवे / इतर गावांची कर नोटिसा पाठविण्यात आल्या यामुळे नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे.
* लोकप्रतिनिधी कुठे होते ? :- नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे की, वाढीचे निर्णय करताना पाठमोरे, जबाबदारी येताच बेपत्ता का? जनआक्रोशादरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक पदाधिकारी नगरपंचायत येथे दाखल झाले होते. मात्र जे निर्णयकर्ते आहेत, त्यांच्यातील बहुतेकांचा ठावठिकाणा नव्हता.
खालापूर नगरपंचायतीत संतापाचा स्फोट!
* नागरिकांची ठाम मागणी :- वैयक्तिक हरकतींच्या अर्जांऐवजी प्रभागनिहाय अर्ज स्विकृत करावेत, तांत्रिक चुका सुधारण्यासाठी नवीन सर्वेक्षण करावे, सात दिवसांत सर्वसाधारण सभेत तोडगा जाहीर करावा.
या नगरपंचायत क्षेत्रात 55% आदिवासी लोकसंख्या असून दुर्लक्ष सहन करणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. नागरिकांच्या आवाजाने नगरपंचायतीत खळबळ उडाली असून पुढील सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास मोठा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home