खोपोलीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष!
२४० कुस्तीपटूंचा जोशपूर्ण सहभाग - कोल्हापूर विभागाने मिळवले विजेतेपद, पुणे विभाग ठरला उपविजेता
फ्रीस्टाईल आणि ग्रेको-रोमन प्रकारात रंगला दमदार कुस्ती महोत्सव ; खेळाडूंच्या घामात उमटला विजयी संघर्ष
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोलीतील काशी स्पोर्ट्स सेंटर येथे नुकतीच राज्यभरातील सर्वोत्तम शालेय कुस्तीपटूंची जंगी लढत पाहायला मिळाली. १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साह, जोश आणि खेळाडूवृत्तीच्या वातावरणात पार पडली. राज्यातील विविध विभागांतील तब्बल २४० मुले आणि मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी काशी स्पोर्ट्सचे अध्यक्ष विक्रम साबळे, डॉं. समर्थ मनुकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ आखाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनावेळी परेश ठाकूर म्हणाले की, खोपोली परिसरात लवकरच कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न होईल. ग्रामीण आणि शालेय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देणे हीच खरी गुंतवणूक आहे.
स्पर्धेत फ्रीस्टाईल आणि ग्रेको-रोमन पद्धतीच्या विविध वजनी गटांमध्ये तासन्तास झुंजी रंगल्या. प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा जोश, डावपेच आणि जिद्द पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार, निरीक्षक संदीप वांजळे आणि दत्ता माने, तसेच तांत्रिक प्रमुख जगदीश मरागजे यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली.
* कोल्हापूर विभागाचे राज्यावर वर्चस्व :- मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने ६ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य पदके जिंकत सांघिक विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात देखील कोल्हापूरने ६ सुवर्ण, ३ रौप्य, ७ कांस्य पदकांसह राज्यावर आपली छाप उमटवली. पुणे विभागाने देखील दमदार कामगिरी करीत मुलींच्या गटात ३ सुवर्ण, ४ रौप्य, १ कांस्य आणि मुलांच्या गटात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ६ कांस्य पदके जिंकून उपविजेतेपद मिळवले.
* महाराष्ट्राचे द्रोणाचार्य सन्मानाने गौरव :- स्पर्धेच्या समारोप प्रसंगी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या प्रशिक्षकांचा “महाराष्ट्राचे द्रोणाचार्य” असा विशेष सन्मान करण्यात आला. या मानकरी प्रशिक्षकांमध्ये दादा लवटे, संदीप पाटील, संदीप पठारे, अमोल यादव, नागेश राक्षे, किरण मोरे, संपती येळकर, विजय चव्हाण आणि दिवेश पालांडे यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, सर्व पंच, प्रशिक्षक आणि आयोजकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास टाटा स्टील कंपनीचे शशी भूषण, भावेश रावळ, सौरभ शर्मा, तसेच रिन्युसेस कंपनीचे चंद्रकांत मोडक आणि निलेश साळुंखे उपस्थित होते.
* खेळाडूंसाठी सुविधा आणि सुरक्षा :- हेल्प फाउंडेशनने उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था, तसेच खेळाडूंसाठी निवास आणि पौष्टिक भोजनाची सोय केली होती. प्रेक्षकांसाठी एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण आणि YouTube वर लाईव्ह स्ट्रीमिंग सुविधा उपलब्ध करून दिली गेली, ज्यामुळे खेळाडूंच्या पराक्रमाला व्यापक पोहोच मिळाली.
स्पर्धेच्या समारोपात विजेत्यांचा सत्कार करीत आयोजकांनी खेळाडूंना संदेश दिला की, कुस्ती ही केवळ क्रीडा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. या खेळाडूंमुळेच भविष्यात महाराष्ट्राला ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गौरव मिळेल.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home