कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार
आमदार महेंद्र थोरवे यांचा मास्टरस्ट्रोक
* महायुतीतून ‘एकजूट’ विरोधकांसाठी धोक्याची घंटा ?
खोपोली / फिरोज पिंजारी :- आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली घोषित झालेल्या या नावाने स्थानिक स्तरावर राजकीय समीकरणात नवे चैतन्य आणि तितकाच धडकीचा माहौल निर्माण केला आहे.
अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना शांत करीत, मतभेदांवर पडदा पाडून, शिस्त व संघटनेची ताकद दाखवत आमदार थोरवे यांनी एक पाऊल नव्हे, तर संपूर्ण चाल पुढे टाकली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे आता जोरदार तयारीला लागणार आहेत.
* चौरंगी लढतीचे संकेत :- कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर होताच खोपोलीच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संभाव्य प्रमुख स्पर्धकांची यादी पाहिली तर शिवसेना (शिंदे गट) कुलदीपक शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) डॉं. सुनील गोटीराम पाटील, भारतीय जनता पार्टीचे विक्रम साबळे यांच्या नावाबाबत निर्णय झाल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप स्पष्टता दिसत नाहिये.
* आ. थोरवे यांची चतुर चाल :- राजकीय तणाव, स्वप्ने आणि नगराध्यक्ष पदावर नजर असलेली अनेक मोठी नावे होती, पण आमदार थोरवे यांच्या शांत पण खात्रीशीर चालीमुळे अनेक “तलवारी म्यान, घरात दिवाळी!” असा प्रकार आहे. बंडोबा जवळपास शांत झाले असून संघटन शिस्तीत व एकसंध दिसत आहे. हा आमदार थोरवे यांचा पहिला विजय मानला जात आहे.
* युतीचा मास्टरस्ट्रोक ? :- राजकीय कोंडी अजून संपलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार खोपोलीत शिवसेना शिंदे गट - भाजप युतीची चर्चा रंगत आहे. अशी चाल यशस्वी झाली तर एक उमेदवार कमी होईल, म्हणजे थेट त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे महाविकास आघाडीसोबत चर्चा करीत असल्याची खबर मिळत आहे. एकंदरीत, दोन्हीकडून राजकीय शिल्पकार सक्रिय असून पुढचे काही दिवस अत्यंत रोचक ठरणार आहेत.
* खोपोलीकरांचे लक्ष याच दिशेने :- जाहीरनामे, चर्चा, कॅम्पेन, सोशल मीडिया युद्ध सर्व काही सुरू आहे. आता प्रश्न एकच की, कुणाचा ‘राजा’ खोपोलीच्या गादीवर बसणार ? शेंडे यांच्या नावावरील शिक्क्याने शिंदे गटाने बाजी मारली आहे. पुढची चाल कोण टाकणार आणि कशी, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home