खोपोलीतील लौजी - चिंचवली साकव काम कासवगतीने
* नागरिकांचा संताप उसळला : रस्ता बंद, खर्च दुप्पट - नागरीकांच्या सहनशीलतेची परीक्षा !
* नगर परिषद बेजबाबदार, शहर नेपाळसारखे होणार का ? आप शहराध्यक्ष ग्यासूद्दीन खान
खोपोली / खलील सुर्वे :- लौजी - चिंचवली रस्त्यावरचा जुना साकव धोकादायक झाल्याने खोपोली नगर परिषद प्रशासनाने तो खोदून वाहतूक बंद केली. मात्र, या निर्णयाला सुमारे एक महिना उलटूनही साकवाचे पुनर्बांधणी काम सुरू झालेले नाही. परिणामी नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. रेल्वे स्थानकाजवळील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसरात्रं मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. साकव खचल्याने मोठा अपघात टळला ; पण दुरुस्तीची कामे वेळेत न झाल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे.
* वाहतूक वळवली, त्रास वाढला :- हा साकव खोदल्याने जवळचा प्रवास लांबला असून जिथे 60 रुपये रिक्षा भाडे लागत होते, आता तिथे 100 रुपये भाडे द्यावे लागत आहे. म्हणजे रस्ता बंद आणि नागरिकांच्या खिशाला बसतोय दंड...लौजी स्टेशन समोरील डीपी रोडहून वाहतूक वळविण्यात आल्याने चिंचवली, शेडवली, नवघर शेनगावंचा प्रवास लांबला आहे. या रस्त्यावर गॅस पाईपलाईन, भुयारी गटार तसेच रस्त्यालगत नवीन गटार बनविण्यासाठी जागोजागी रस्ता खोदल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे कसरत होय. प्रवास अंतर वाढले. रस्ता चिखलाने व खड्ड्यांनी भरलेला आहे...गॅस लाईन व गटार कामांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अशात नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की, साकव बंद, आणि दंड आम्हाला का ? लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभाग कामात मागे पडत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
* आम आदमी पार्टीचे ग्यासूद्दीन खान यांचा आरोप :- खोपोली नगर परिषद कामशून्य आहे. अधिकारी आणि बांधकाम विभाग झोपेत आहेत का ? नागरिकांवर बांगलादेश - नेपाळसारखी परिस्थिती आणणार का ? अशी संतप्त प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी व्यक्त करीत त्यांनी इशारा दिला की, काम त्वरित सुरू करा, नाहीतर नागरिक रस्त्यावर उतरतील.
* निवडणूक जवळ, काम थांबले ? :- नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर असतांना हे काम रखडल्याने प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसाढवळ्या स्टेशनजवळ खड्डे, ठिकठिकाणी गटार काम, पाईपलाईन...खोपोली विकासाच्या नावाखाली खोदकामाचे शहर बनले आहे.
* नियोजनाचा अभाव अन् सुरक्षेकडे दुर्लक्ष :- खोपोली नगर परिषदेकडून या कामाबाबत नियोजन अतिशय ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. हाई-व्होल्टेज केबल्स, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइन, रेल्वे मार्गालगतचा भाग...नियम व नियोजनाशिवाय हे काम झाले का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील व बांधकाम विभागाचे अभियंता, ठेकेदार यांना नागरीकांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून व अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष असून नागरीकांच्या जीवापेक्षा ठेकेदारावर प्रेम का ? बांधकाम विभागाचे अभियंता, वरिष्ठ अधिकारी नेमके काय करतात? खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांना कामातील दिरंगाई, नियोजनाचा अभाव अन् सुरक्षेकडे दुर्लक्ष दिसत नाही का ? एखादी दुर्घटना झाल्यावरच मुख्याधिकारी पाटील लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कामाला त्वरित सुरुवात करावी, वाहतूक पर्याय व्यवस्थित द्यावा, कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, प्राधान्याने नियोजन व सुरक्षितता उपाय करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साकवाचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकांच्या तोंडावर प्रशासनाची परीक्षा होत आहे. कामे जलद व जबाबदारीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home